लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 11:23 AM2024-06-16T11:23:53+5:302024-06-16T11:25:32+5:30

Lok Sabha Speaker : अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. 

Who will be the Lok Sabha Speaker? Modi 3.0 'kingmakers' JD(U), TDP differ on key issue | लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?

लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?

नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा तिसऱ्यांदा शपथविधी झाल्यानंतर २४ जूनपासून संसदेचे पहिले अधिवेशन सुरू होणार आहे. हे अधिवेशन आठ दिवस चालणार आहे. या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. 

या निवडणुकीपूर्वी एनडीएच्या मित्रपक्षांकडे लोकसभा अध्यक्षपद असावे, असा आग्रह विरोधक वारंवार करत आहेत. या मुद्द्यावर एनडीएमधील घटक पक्ष असलेल्या नितीश कुमार यांच्या जनता दलाने (संयुक्त) भाजप जो काही निर्णय घेईल, त्याला पक्ष पाठिंबा देईल, असे स्पष्ट केले आहे. याचबरोबर, चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने एनडीएमधील सर्व पक्षांच्या सहमतीने उमेदवार निवडला जावा, असे म्हटले आहे.

जेडीयू आणि टीडीपी एनडीएमध्ये घटक पक्ष आहेत. भाजपने नियुक्त केलेल्या उमेदवाराला हे दोन्ही पक्ष पाठिंबा देतील, असे जनता दल (युनायटेड) नेते केसी त्यागी यांनी शनिवारी सांगितले. तसेच, जेडीयू आणि टीडीपी एनडीएमध्ये ठाम आहेत. भाजपने लोकसभा अध्यक्षांसाठी नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला आम्ही पाठिंबा देऊ, असे केसी त्यागी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सर्वसहमती असलेल्या उमेदवारालाच लोकसभा अध्यक्षपद मिळेल, असे टीडीपीचे राष्ट्रीय प्रवक्ते पट्टाभी राम कोमरेड्डी यांनी सांगितले. ते म्हणाले, यासंदर्भात एनडीएचे मित्रपक्ष एकत्र बसून आमचा लोकसभा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल, हे ठरवतील. एकमत झाल्यानंतरच उमेदवार उभा केला जाईल आणि टीडीपीसह सर्व मित्र पक्ष उमेदवाराला पाठिंबा देतील.

भाजपने मित्रपक्षालाच अध्यक्षपद द्यावे - अशोक गहलोत
काँग्रेस नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, केवळ टीडीपी आणि जेडीयूच नाही तर संपूर्ण देशाची जनता लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे उत्सुकतेने पाहत आहे. भविष्यात कोणतेही असंवैधानिक कृत्य करण्याचा भाजपचा हेतू नसेल, तर त्यांनी मित्रपक्षालाच अध्यक्षपद द्यावे. युतीचा धर्म पाहता १९९८ ते २००४ पर्यंत अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये टीडीपी आणि शिवसेनेकडे अध्यक्षपद होते आणि २००४ ते २००९ पर्यंत यूपीए सरकारमध्ये सीपीआय (एम) कडे अध्यक्षपद होते आणि त्यांनी लोकसभेचे चांगले व्यवस्थापन केले होते, असे अशोक गहलोत यांनी सांगितले.

Web Title: Who will be the Lok Sabha Speaker? Modi 3.0 'kingmakers' JD(U), TDP differ on key issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.