भारताची ताकद वाढणार, ही अत्याधुनिक विमाने हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 11:31 PM2020-06-18T23:31:21+5:302020-06-18T23:44:21+5:30

भारताने आपली सामरिक ताकद वाढवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये सुरू झालेला तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताने आपली सामरिक ताकद वाढवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

त्यासाठी भारतीय हवाई दलाने १२ सुखोई आणि २१ मिग-२९ विमानांची तत्काळ खरेदी करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाला पाठवला आहे. आता संरक्षण मंत्रालय या प्रस्तावावर पुढील आठवड्यात निर्णय घेईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिग-२९ विमानांचे रशिया मॉडिफिकेशन करून त्यांना अद्ययावत बनवणार आहे. या विमानांमध्ये कालानुरूप बदल करण्याचा प्रस्ताव हवाई दलाने दिला आहे.

२०१६ मध्ये राफेल विमानांच्या खरेदी करारावर सह्या केल्यानंतर आता हवाई दलात दाखल होणारा ३३ विमानांचा हा दुसरा ताफा असेल.

हवाई दलाने विमानांसंबंधीची सर्व उपकरणे खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे भविष्यात खराब होणारे विमानांचे भाग दुरुस्त करता येतील.

यापूर्वी रशियाने भारतीय हवाई दलाकडील लढाऊ विमानांची कमतरता भरून काढण्यासाठी नवीन लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला होता.

जी नवीन विमाने खरेदी करण्याची योजना आहे ती आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि अपग्रेडेड असतील, असा दावा आधी करण्यात आला होता. भारतीय हवाई दलाकडे मिग-२९ विमाने आधीपासूनच आहेत. मात्र नव्या मिग-२९ विमानांचे रडार आणि अन्य उपकरणे ही आधुनिक मापदंडांना अनुरूप असतील.