CoronaVirus Live Updates : "महाराष्ट्रात डबल म्युटेशन असलेल्या कोरोनामुळे संसर्ग वेगाने, परिस्थिती चिंताजनक", तज्ज्ञांनी दिला 'हा' मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 02:23 PM2021-03-30T14:23:20+5:302021-03-30T14:56:25+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोनाचा संसर्ग आता पुन्हा वेगाने होत आहे. कोरोनामध्ये डबल म्युटेशन झाल्याचे आढळून आले आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 56,211 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 271 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,20,95,855 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,62,114 वर पोहोचला आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 5,40,720 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,13,93,021 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग आता पुन्हा वेगाने होत आहे. कोरोनामध्ये डबल म्युटेशन झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे लस प्रभावी ठरेल का? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. या प्रश्नांची उत्तरं आता तज्ज्ञांनी दिली आहेत.

प्रसिद्ध इम्यूनोलॉजिस्ट आणि एम्सचे माजी डीन प्रा. एन. के. मेहरा यांनी आता याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती दिली आहे. या डबल म्युटेशन असलेल्या कोरोनाला अजिबात घाबरण्याची गरज नाही. हा व्हायरसही लवकरच संपेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे संसर्ग वेगाने वाढत आहे. पण यामुळे खरचं चिंतेची गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. जगातील बहुतेक देशांता हा कोरोनाचा नवीन प्रकार आढळून आला आहे.

कोरोना व्हायरस आपलं स्वरुप सातत्याने बदलत असतो. भौगोलिक स्थितीनुसार ते वेगवेगळे असू शकतं. महत्त्वाचं म्हणजे त्याचा प्रादुर्भाव आणि त्याच्या लक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं एन. के. मेहरा यांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या नवीन प्रकाराने घाबरण्याची अजिबात गरज नाही. हा लवकरच संपेल. टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या तीन बाबींवर आपल्याला भर द्यायचा आहे. रोजच पूर्ण काळजी घ्यायची आहे. मास्क घालणं गरजेचं आहे, सोशल डिस्टन्सिंग राखा आणि हात सतत धूत राहा असं देखील म्हटलं आहे.

कोरोनाच्या व्हेरियंट आणि स्ट्रेनमध्ये काही फरक असतो का? यावरही मेहरा यांनी तांत्रिकदृष्ट्या त्याचे स्वरूप वेगळे आहे असं म्हटलं आहे. RNA आपलं स्वरुप बदलताना अनेकदा एरर दाखवतात. यातून नवीन व्हायरस तयार होतो.

व्हायरस एकसारखेच दिसतात. पण पूर्णपणे ते समान नसतात. व्हायरल व्हायरसमध्ये अशा बदलांना म्युटेशन म्हणतात. ज्या व्हायरसमध्ये असे म्युटेशन्स असतात त्यांना व्हेरियंट्स म्हणतात. एका व्हेरियंटमध्ये एक किंवा अनेक म्युटेशन्स होऊ शकतात असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरही मेहरा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात डबल म्युटेशन असलेला कोरोना व्हायरस आढळून आला आहे. त्याचे नमुने समोर आले आहेत.

महाराष्ट्रात डबल म्युटेशन असलेल्या कोरोनामुळे संसर्ग वेगाने होत आहे. ही चिंतेची बाब आहे. पण कोरोनावरील जी लस आपल्याकडे आहे ती या डबल म्युटेशन्स असलेल्या नवीन कोरोनावरही प्रभावी आहे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.

देशात कोरोना संसर्गाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत मे 2020 पेक्षा आता वाढ होत आहे.

एक कोरोना संक्रमित व्यक्ती कोणत्याही निर्बंधाशिवाय 30 दिवसांत सरासरी 406 लोकांना संक्रमित करू शकतो. मे 2020 नंतर कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या साप्ताहिक घटनांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे.

केंद्र सरकारने 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची कोरोनासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. त्याअंतर्गत राज्यांमधील कोरोना तपासणीची संख्या वेगाने वाढविण्यासाठी आणि कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी कडक कारवाई करण्यास सांगितले गेले आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अशा 46 जिल्ह्यांकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे ज्यात या महिन्यात संक्रमणाच्या एकूण प्रकरणांपैकी 71% आणि या प्रकरणांमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या 69% टक्के नोंदविण्यात आली आहेत.

आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव अधिक आहे. देशात मागील एका आठवड्यात आढळून आलेल्या प्रकरणांपैकी 59.8 टक्के रुग्ण याच जिल्ह्यांमधील आहेत असं म्हटलं आहे.

महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, तामिळनाडू, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, जम्मू कश्मीर, कर्नाटक, पंजाब आणि बिहार या राज्यांसाठी आणि केंद्र शासित प्रदेशांची बैठक घेण्यात आली.