उद्धव ठाकरेंसाठी बाळासाहेबांनी शिवसेनेत तयार केलेले पद आता आदित्यला मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 11:13 AM2022-08-05T11:13:53+5:302022-08-05T11:24:04+5:30

मराठी माणसाच्या हक्कासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना या संघटनेची स्थापना केली. त्यानंतर कालांतराने हीच शिवसेना राजकीय पक्ष म्हणून उभारी घेऊ लागली. शिवसेनेच्या इतिहासात अनेक बंड झाले. परंतु या बंडातूनही शिवसेना उभी राहिली.

मात्र अलीकडेच एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला हादरा बसला आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतरचं पहिलंच बंड असून यामुळे पक्षात उभी फूट पडल्याचं दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत विधानसभेतील ५५ पैकी ४० आमदार आणि संसदेतील १९ खासदारांपैकी १२ खासदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

२०१९ च्या निकालानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी युती तोडून थेट काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. राज्यात महाविकास आघाडी जन्माला आली. याच मविआ सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. परंतु शिवसेनेतील बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांनी सत्तेतून पायउतार व्हावं लागलं.

उद्धव ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती थेट घटनात्मक पदावर बसली. तर दुसरीकडे उद्धव यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनीही निवडणूक लढवत वरळी मतदारसंघातून विधानसभेत धडक दिली. त्यामुळे उद्धव-आदित्य हे ठाकरे प्रशासकीय पातळीवर पहिल्यांदाच सक्रीयपणे उतरले होते. मात्र शिवसेनेतील नेतृत्वावर नाराज होऊन एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदार-खासदारांनी बंड पुकारले.

शिवसेनेच्या या बंडाळीमुळे पक्षात ठाकरे यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरी शिवसेना आम्हीच आहोत असा दावा एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक करत आहेत. याबाबतची कायदेशीर लढाई सुप्रीम कोर्टात सुरू आहे. धनुष्यबाण आम्हालाच मिळावे यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न केले जात आहे. मात्र ठाकरे-शिंदे संघर्षात शिवसेनेला उभारी देण्यासाठी आदित्य ठाकरेंनी पुढाकार घेतला आहे.

आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जात ठिकठिकाणी निष्ठा यात्रा काढली आहे. आदित्यच्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचंही दिसून येत आहे. बंडखोर आमदारांवर आक्रमक भाषेत आदित्य ठाकरे निशाणा साधत आहे. गद्दारांनी हिंमत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावं असं थेट आव्हान आदित्य देत आहेत.

आदित्य ठाकरे यांचे शिवसेनेतील वाढते वलय पाहता आता त्यांच्यावरील जबाबदारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. .येत्या काळात शिवसेनेत मोठे फेरबदल झाल्याचं दिसून येणार आहे. उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे ज्याचा उल्लेख खुद्द बाळासाहेबांनी शिवाजी पार्कच्या सभेत तोडफोड सेना म्हणून केला होता. तो तेजस ठाकरेही राजकारणात एन्ट्री मारण्याची शक्यता आहे.

त्यात आदित्य ठाकरे यांच्यावर शिवसेनेत कार्याध्यक्षपदाची जबाबदारी येऊ शकते. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेतील कार्याध्यक्षपद गोठावून त्याऐवजी पक्षप्रमुखपद निर्माण केले. त्यावेळी कार्याध्यक्ष असलेले उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले. परंतु आता पुन्हा शिवसेनेत कार्याध्यक्षपद निर्माण केले जाण्याची शक्यता आहे आणि याच पदाची जबाबदारी आदित्य ठाकरेंना मिळणार असल्याचं बोलले जात आहे.

शिवसेनेत उद्धव ठाकरे सक्रीय झाल्यापासून राज ठाकरे हळूहळू बाजूला पडू लागले. राज ठाकरे हे शिवसेनेचे नेते आणि भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष म्हणून काम सांभाळत होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासाठी बाळासाहेबांनी पक्षात अस्तित्वात नसलेले कार्याध्यक्षपद निर्माण केले.

शिवसेनेत उद्धव आणि राज असे दोन गट पडल्याचं चित्र निर्माण झाले होते. तेव्हा बाळासाहेबांच्या सांगण्यावरून राज ठाकरे यांनीच महाबळेश्वर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्याबाबतचा ठराव मांडला होता. त्याला शिवसेनेच्या नेत्यांनी अनुमोदन दिले होते. त्यामुळे बाळासाहेबांनी तयार केलेल्या कार्याध्यक्षपदाची धुरा आता उद्धव ठाकरेंनंतर आदित्यच्या खांद्यावर येण्याची शक्यता आहे.