'विक्रम'वीर झाम्पा! ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूनं इतिहास रचला; असं करणारा पहिला खेळाडू ठरला

Adam Zampa Records : नामिबियाला नमवून ऑस्ट्रेलियाने सुपर ८ चे तिकीट मिळवले.

ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ॲडम झाम्पाने बुधवारी ऐतिहासिक कामगिरी केली. नामिबियाविरूद्ध चार बळी घेऊन त्याने आपल्या संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

नामिबियाला नमवून ऑस्ट्रेलियाने सुपर ८ चे तिकीट मिळवले. खरे तर ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० बळी घेणारा झाम्पा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे.

३२ वर्षीय फिरकीपटू ॲडम झाम्पाने झेन ग्रीन, डेव्हिड विसे, रूबेन ट्रम्पलमॅन आणि बर्नार्ड शोल्टज यांना बाहेरचा रस्ता दाखवला.

ऑस्ट्रेलियन स्टार झाम्पाने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये अर्थात ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १०० बळी घेण्याची किमया साधली. त्याने ८३ सामन्यांमध्ये ७.२० च्या सरासरीने गोलंदाजी करताना १०० बळी पूर्ण केले.

प्रथम गोलंदाजीत मग फलंदाजीत दबदबा दाखवत ऑस्ट्रेलियाने नामिबियाविरूद्ध मोठा विजय मिळवला. या विजयासह कांगारूंनी सुपर ८ मध्ये प्रवेश केला.

ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये विजयाची हॅटट्रिक ऑस्ट्रेलियाला सहा गुण देऊन गेली. त्यांच्यापाठोपाठ ब गटात ५ गुणांसह स्कॉटलंड दुसऱ्या स्थानी आहे.

बुधवारी झालेल्या सामन्यात नामिबियाने दिलेल्या ७३ धावांच्या आव्हानाचा सहज पाठलाग करत ऑस्ट्रेलियाने स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला. विश्वचषकातील २४ वा सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळवला गेला.

७३ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी स्फोटक खेळी केली. अवघ्या ५.४ षटकांत १ बाद ७४ धावा करून कांगारूंनी मोठा विजय साकारला.

डेव्हिड वॉर्नर २० धावा करून बाद झाला. तर ट्रॅव्हिस हेड (नाबाद ३४ धावा) आणि कर्णधार मिचेल मार्शने नाबाद १८ धावा करून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सुपर ८ चे तिकीट निश्चित केले.