भारताची सर्वात ‘संथ’ ट्रेन; ४५ km साठी लागतात ५ तास, एकदा तरी प्रवास करायलाच हवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 13:37 IST2026-01-25T13:33:13+5:302026-01-25T13:37:56+5:30

Railway Interesting Facts: या प्रवासात हिरव्यागार डोंगररांगा, बोगदे, खोल दऱ्या, पूल अन् तीव्र वळणे अक्षरशः मंत्रमुग्ध करतात.

Railway Interesting Facts: एकीकडे वंदे भारत, तेजस, अमृत भारत आणि वंदे भारत स्लीपरसारख्या अत्याधुनिक आणि वेगवान गाड्यांमुळे Indian Railways ची जगभरात चर्चा होते. मात्र, याच भारतात एक अनोखी आणि सर्वात संथ गतीने धावणारी ट्रेनदेखील आहे. अवघे ४५ ते ४६ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी या ट्रेनला तब्बल ५ तासांचा वेळ घेते. विशेष म्हणजे, या प्रवासात १६ बोगदे, २५० पूल आणि २०८ तीव्र वळणे येतात.

अलीकडच्या काळात भारतीय रेल्वेने अनेक ऐतिहासिक टप्पे गाठले आहेत. वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत एक्सप्रेससारख्या गाड्यांमुळे दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात वेग, आराम आणि आधुनिक सुविधांचा उत्कृष्ट संगम पाहायला मिळतो. PIB च्या माहितीनुसार, २६ डिसेंबर २०२५ पर्यंत देशभरात १६४ वंदे भारत ट्रेनचे संचालन सुरू आहे.

केवळ २०२५ या वर्षातच १५ नव्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या. याशिवाय, नमो भारत रॅपिड रेल सेवाही ‘विकसित भारत’ या संकल्पनेला गती देत आहेत. सध्या भुज-अहमदाबाद आणि जयनगर-पाटणा या दोन मार्गांवर नमो भारत रॅपिड रेल सेवा कार्यरत आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवरील दक्षिण रेल्वेच्या अधिकृत पेजवरून भारतातील सर्वात संथ ट्रेनविषयी माहिती देण्यात आली आहे. या ट्रेनचे नाव Nilgiri Mountain Railway आहे. तामिळनाडूमधील नीलगिरी पर्वतरांगांमधून जाणारी ही रेल्वे ‘टॉय ट्रेन’ म्हणूनही ओळखली जाते. ही ट्रेन मेट्टूपलयम ते ऊटी दरम्यान धावते आणि अवघ्या ४६ किमीच्या प्रवासासाठी सुमारे ५ तास घेते.

रेल्वे विभागाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “युनेस्कोमध्ये नोंद असलेल्या नीलगिरी माउंटन रेल्वेचा अवर्णनीय अनुभव घ्या. हिरव्यागार डोंगररांगा, भव्य बोगदे, खोल दऱ्या, पूल आणि तीव्र चढ-उतारांमधून जाणारा हा प्रवास अक्षरशः मंत्रमुग्ध करणारा आहे.”

रिपोर्टनुसार, ट्रेन सकाळी ७ वाजता मेट्टूपलयम येथून सुटते आणि दुपारी 12 वाजता ऊटी येथे पोहोचते. तर, परतीचा प्रवास दुपारी 2 वाजता ऊटीहून सुरू होतो आणि सायंकाळी ५.३० वाजता मेट्टूपलयम येथे संपतो. या मार्गावर कुनूर, वेलिंग्टन, अरावनकाडू, केट्टी अशी निसर्गरम्य ठिकाणे लागतात.

नीलगिरी माउंटन रेल्वेचा समावेश UNESCO World Heritage यादीत करण्यात आला आहे. पश्चिम घाटातील नितांत सुंदर दृश्ये, ढगांत हरवलेले डोंगर आणि ऐतिहासिक रेल्वे तंत्रज्ञानामुळे हा प्रवास आयुष्यात एकदा तरी करायलाच हवा, असे पर्यटन तज्ज्ञांचे मत आहे. वेगवान वंदे भारत ट्रेन भारताच्या प्रगतीचे प्रतीक असतील, तर नीलगिरी माउंटन रेल्वे ही भारताच्या वारसा आहे. या देशातील सर्वात ‘संथ’ ट्रेनमध्ये एकदा प्रवास केला, तर तो अनुभव कधीच विसरता येणार नाही.