Russia Ukraine War: पुतीन युद्धाचा सर्वात महत्वाचा मंत्र विसरले? चाणक्यांच्या आधी चिनी तत्त्ववेत्त्याने सांगितलेले, जिंकायचे असेल तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 11:02 AM2022-04-04T11:02:20+5:302022-04-04T11:11:23+5:30

why Russia on Backfoot in Ukraine War: दुसऱ्या महायुद्धात हिटलरने दोन चुका केल्या होत्या. पोलंडला कमी लेखले होते, सुमारे २५०० वर्षांपूर्वी दोन तत्ववेत्त्यांनी युद्ध कोणी, केव्हा आणि कसे लढावे हे सांगितले होते. त्यात पहिला चिनी तत्ववेत्ता आणि दुसरे भारताचे चाणक्य होते.

दुसऱ्या महायुद्धावेळी हिटलरने आपले सैन्य हॉलंडवर हल्ला करण्यासाठी पाठविले. ह़ॉलंड असा देश आहे जो समुद्रपातळीपेक्षा खाली आहे. यामुळे बंधारे, भींतींद्वारे त्याला आपले संरक्षण करावे लागते. छोटासा देश काही तासांची गोष्ट म्हणत हिटलरने आपली फौस घुसविली. परंतू, तेथील लोकांनी लढण्याचे ठरविले. ज्या गावात नाझी सैन्य येईल तिथले बंधारे फोडले जाऊ लागले. यामुळे नाझी सैन्याचे मोठे नुकसान झाले. अखेर हिटलरच म्हणाला होता, मृत्यूसाठी तयार असलेल्या किंवा मारण्यासाठी तयार असलेल्या लोकांना आपले गुलाम बनविणे कठीण असते.

पुतीन यांचीही तीच अवस्था झाली आहे. युक्रेनमध्ये पहिल्या १२ तासांत रशियाने जोरदार मुसंडी मारली होती. परंतू, झेलेन्स्किी यांनी नागरिकांना युद्धात उतरण्याचे आवाहन केले आणि सारे फसले. आज महिना उलटला तरी रशियाला महत्वाचे एकही शहर मिळविता आले नाही. याचसोबत रशियाचा खजिनाही रिता होत चालला आहे.

युद्धाच्या बाबतीत चाणक्य निती आणि 'Art of War' खूप प्रसिद्ध आहेत. ते तेव्हाही लागू होत होते, आताही लागू होतात. चिनी तत्त्ववेत्ता सॅन त्झू ने आपल्या आर्ट ऑफ वॉरमध्ये बऱ्याच गोष्टी नमूद केल्या आहेत. सॅन त्झू म्हणतात...

'जेव्हा लढाई खरी असते आणि जिंकण्यास उशीर होऊ लागतो. तेव्हा शस्त्रे आपली धार गमावतात आणि सैनिकांतील जोश थंड होतो. प्रदीर्घ युद्धात, राज्याची सर्व संसाधने त्या युद्धाचा भार सहन करण्याची क्षमता गमावतात. तेव्हा शेजारील राज्ये तुमच्या परिस्थितीचा फायदा घेण्याच्या तयारीत असतात. आता रशियासमोरील संकटही वाढताना दिसत आहे.

'युद्ध करणे आणि जिंकणे हे मोठे काम नाही, मोठे काम म्हणजे युद्ध न करता शत्रूचे सर्व अडथळे नष्ट करणे. तोडफोड न करता शत्रूचा संपूर्ण प्रदेश सुरक्षितपणे ताब्यात घेणे हे व्यावहारिक युद्धाचे उत्तम उदाहरण आहे.' युक्रेन युद्धात हे दिसत नाही. रशियाने सर्व काही उद्ध्वस्त केले आहे. सरकारी कार्यालयेच नव्हे तर लोकांची घरे, शाळा हॉ़स्पिटल देखील.

'सैन्य दीर्घकाळ युद्धभूमीत ठेवल्याने राज्याची अर्थव्यवस्था विस्कळीत होते आणि जनतेकडून ती वसूल केल्याने लोक अडचणीत येतात. दुसऱ्या शब्दांत, सैन्याच्या खर्चामुळे राज्यात महागाई वाढते आणि वाढलेल्या किमतींमुळे लोकांच्या ठेवी आणि भांडवल वाया जाते आणि त्यांना प्रचंड करही भरावा लागतो, रशियातही आता तेच होणार आहे.

आज रशियातील प्रत्येक व्यक्ती या युद्धाची किंमत चुकवत आहे. रशियन चलन रूबलची स्थिती वाईट आहे. परदेशी कंपन्या आपले व्यवसाय बंद करत आहेत, तसेच सर्व वस्तूंचा पुरवठाही बंद होत आहे. सर्वसामान्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, चलन घसरल्याने त्यांच्या भांडवलाचे मूल्यही संपले आहे. त्याचबरोबर त्यांच्यासाठी परदेशातील संधीही संपल्या आहेत.

सेंटर फॉर इकॉनॉमिक रिकव्हरीच्या नव्या अभ्यासानुसार रशिया आणि रशियन जनतेला या युद्धाची किंमत दीर्घकाळ सहन करावी लागणार आहे. युद्धाच्या पहिल्या पाच दिवसांत रशियाचे ७ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. या युद्धामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीमुळे, आगामी काळात रशियन जीडीपीवर $ 2.7 अब्जचा भार वाढेल.

या युद्धात रशियाला दररोज 20 अब्ज डॉलरहून अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. आता हे युद्ध ४० दिवस चालले आहे, तर रशियाचे किती नुकसान झाले असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता.

ही फक्त युद्धाची किंमत आहे. याशिवाय रशियातील शेअर बाजार अनेक दिवस बंद ठेवावा लागला. रशियन चलन रुबल ऐतिहासिक घसरणीचा सामना करत आहे. निर्बंधांमुळे, गॅस-तेलापासून अनेक गोष्टी, कोणताही देश रशियाकडून घेऊ किंवा देऊ शकत नाही. या सर्व परिस्थिती रशियन बाजाराला महागाई, मंदीच्या दिशेने नेत आहेत.

रशियन ताफ्यांचा वेग कमी होण्याचे आणखी एक कारण आहे. ताफ्यात येणारी वाहने आणि टाक्यांसाठी इंधन पुरवठा करणे इतके सोपे नाही. याशिवाय थंडीच्या काळात सैनिकांना जीवनावश्यक वस्तू आणि अन्न आणि दारूगोळा पोहोचवणेही कठीण होत आहे.

ही आव्हाने दुसऱ्या महायुद्धात रशियावर आक्रमण केलेल्या हिटलरच्या सैन्याच्या पराभवाचे कारण बनली. जेव्हा इंधनाच्या कमतरतेमुळे रणगाडे रांगेत उभे होते, तेव्हा थंड हिवाळ्यात आणि बर्फात लढणारे सैनिक अन्न आणि उबदार कपडे आणि दारूगोळा यांच्या कमतरतेशी झुंजत होते. यामुळे युद्ध लढणाऱ्या रशियन सैन्याने त्यांचे मोठे नुकसान केले.

'विजेता तोच असेल ज्याला कधी लढायचे आणि कधी नाही हे माहित आहे. आपली शक्ती कुठे वापरायची आणि कुठे नाही नाही हे ज्याला माहित आहे तो जिंकेल. योग्य लष्करी रणनीतीकार तो असतो जो आपल्या सैनिकांचे कमीत कमी नुकसान करत शत्रूला गुडघे टेकायला लावतो.' या तत्ववेत्त्यानुसार पुतीन या गोष्टींमध्ये चुकले आणि युक्रेनचा घास त्यांच्या गळ्यात अडकला आहे.