ईडीची मोठी कारवाई, बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांची ४४४० कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 10:16 AM2024-06-15T10:16:51+5:302024-06-15T10:19:23+5:30

Former BSP MLC Mohammed Iqbal : ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मोहम्मद इक्बाल हे फरार असून ते दुबईला पळून जाण्याची शक्यता आहे.

ED attaches assets worth Rs 4,440 crore in money laundering probe against ex-UP BSP MLC Mohammed Iqbal | ईडीची मोठी कारवाई, बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांची ४४४० कोटींची मालमत्ता जप्त

ईडीची मोठी कारवाई, बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांची ४४४० कोटींची मालमत्ता जप्त

सहारनपूरमध्ये अवैध खाणकाम प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांच्या ग्लोकल युनिव्हर्सिटीची १२१ एकर जमीन आणि इमारत जप्त केली आहे. मोहम्मद इक्बाल यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत जवळपास ४,४४० कोटी रुपये आहे. 

सीबीआय आणि इतर एजन्सी बसपाचे आमदार मोहम्मद इक्बाल यांच्याविरोधातही तपास करत आहेत. बसपा सरकारच्या काळात झालेल्या बहुचर्चित साखर कारखान्याच्या घोटाळ्याप्रकरणी ईडी मोहम्मद इक्बाल यांच्याविरुद्ध चौकशी करत आहे. या प्रकरणात २०२१ मध्ये मोहम्मद इक्बाल यांची १०९७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान, ईडीने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मोहम्मद इक्बाल यांनी २०१० ते २०१२ यादरम्यान सहारनपूर आणि आसपासच्या बेकायदेशीर खाणकामातून ५०० कोटींहून अधिक रुपये जमा केले होते. यानंतर त्यांनी ही रक्कम ग्लोकल युनिव्हर्सिटीमध्ये गुंतवली होती. मोहम्मद इक्बाल यांनी ही जमीन अब्दुल वाहिद एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून खरेदी करून त्यावर युनिव्हर्सिटी उभारली होती.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मोहम्मद इक्बाल हे फरार असून ते दुबईला पळून जाण्याची शक्यता आहे. त्यांची चार मुले आणि भाऊ वेगवेगळ्या गुन्ह्यात तुरुंगात आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, मोहम्मद इक्बाल हे अब्दुल वाहिद एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष होते. तसेच, ट्रस्टचे सर्व विश्वस्त मोहम्मद इक्बाल यांच्या कुटुंबातील होते. 

सीबीआयने १० वर्षांपूर्वी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. यानंतर ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अवैध खाणकाम प्रकरणी लीजधारक महमूद अली, दिलशाद, मूहम्मद इनाम, महबूब आलम, नसीम अहमद, अमित जैन, नरेंद्र कुमार जैन, विकास अग्रवाल, मोहम्मद इक्बाल यांचा मुलगा मुहम्मद वाजिद, मुकेश जैन, पुनित जैन यांच्यावर आरोप आहे.

Web Title: ED attaches assets worth Rs 4,440 crore in money laundering probe against ex-UP BSP MLC Mohammed Iqbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.