नववधूप्रमाणे नटून थटून दफनभूमीत पोहोचली तरुणी, सत्य परिस्थिती समजताच उपस्थितांना झाले अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 02:57 PM2021-08-28T14:57:23+5:302021-08-28T15:00:44+5:30

Bride arrived at the cemetery in a wedding dress: एका दफनभूमीमध्ये दु:खी वातावरण असताना एक तरुणी नववधूप्रमाणे सजून हातात फुलांचा गुच्छ घेऊन पोहोचली. ते दृश्य पाहून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला

एका दफनभूमीमध्ये दु:खी वातावरण असताना एक तरुणी नववधूप्रमाणे सजून हातात फुलांचा गुच्छ घेऊन पोहोचली. ते दृश्य पाहून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. २० वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी नववधूप्रमाणे नटून थटून आलेल्या एका तरुणीकडे लोट एकटक पाहत होते. मात्र सत्य परिस्थिती समजली तेव्हा तिथे उपस्थित असलेल्यांना अश्रू अनावर झाले.

द सन या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार ब्रिटनमधील लाइमेरिक येथील एस्केटन कब्रस्थानामध्ये नववधूप्रमाणे सजून आलेल्या या तरुणीचे नाव केट क्विलिंगन आहे. केट क्विलिंगन हिचा विवाह २० वर्षीय बॉयफ्रेंड माइल्स मायले याच्याशी होणार होता. विवाहाची सर्व तयारी झाली होती. त्याच दरम्यान एक अत्यंत दु:खद घटना घडली.

आयर्लंडमधील लिमरिकमधील सेंट मुंचिन चर्चमध्ये दोघांचेही लग्न होणार होते. या लग्नासाठी माईल्स कारमधून येत होता. त्याचवेळी रस्त्यात भीषण अपघात झाला. या अपघातात माइल्सचा मृत्यू झाला. माइल्स कारच्या फ्रंट सीटवर होता. त्यामध्ये त्याला गंभीर इजा झाली होती.

या अपघातानंतर पोलिसांनी आरोपी चालकाला पकडले होते. मात्र त्याचे वय पाहून पोलिसांनी त्याला सोडून दिले. दुसरीकडे विवाहाच्या तयारीदरम्यान वधूला या अपघाताबाबत समजले तेव्हा तिला जबर मानसिक धक्का बसला.

माईल्सच्या मृत्यूबाबत ऐकून केट क्विलिंगनचे मन सुन्न झाले. ती दफनभूमीमध्ये होणाऱ्या पतीला अखेरचा निरोप देण्यासाठी लग्नाच्या पोशाखामध्येच आली. माईल्सचा फोटो घेऊन रडत असलेल्या केटला पाहून प्रत्येकजण भावूक झाला.

केट क्विलिंगनच्या वडिलांनी सांगितले की, माझी मुलगी माईल्सवर खूप प्रेम करायची तसेच तिला त्याचासोबत संपूर्ण जीवन घालवायचे होते.

केटने तिच्या भावी पतीला श्रद्धांजली देताना फेसबुकवर लिहिले की, हा माझ्या जीवनातील सर्वात कठीण दिवस आहे. मात्र मला माहिती आहे की तू माझ्यासोबत नेहमीच राहशील. मी काय विचार केला आहे ते तुला माहिती आहे, अशी माझी अपेक्षा आहे.

केट पुढे लिहिते की, मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करत राहीन. आज तुला निरोप द्यायची वेळ आली असली तरी आपण दोघे पुन्हा एकदा भेटू, याचा मला विश्वास आहे.