"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 10:27 AM2024-05-20T10:27:07+5:302024-05-20T10:28:51+5:30

राजन विचारे यांनी बोगस मतदानाचा आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार पलटवार केला आहे.

cm eknath shinde counterattack on shivsena ubt rajan vichare over bogus voting allegations | "त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

CM Eknath Shinde ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात एकूण १३ लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून यामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. ठाण्यात मतदानाला सुरुवात होताच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी बोगस मतदानाचा आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार पलटवार केला आहे. समोरच्या उमेदवाराला पराभवाची चाहूल लागल्यानेच असे आरोप केले जात असल्याचा हल्लाबोल शिंदे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना केला आहे.

राजन विचारेंच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, "नौपाडा परिसरातील एक इव्हीएम मशीन एक तास बंद पडलं होतं. मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून हे मशीन लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बोगस मतदार आणण्याची आम्हाला काय आवश्यकता आहे? कारण आज संपूर्ण मतदार महायुतीच्या प्रेमात आहे. आम्ही ठाण्यात काम केलंय, ठाणे हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघेंचा हा बालेकिल्ला आहे. या ठाण्यासाठी मी मागील अनेक वर्ष काम केलं आहे. त्यामुळे इथं मतदार स्वेच्छेने मतदान करतोय आणि सर्वजण मतदान करण्यासाठी २० तारखेची वाट पाहत होते. ज्यांनी आरोप केला आहे, त्यांनी शस्त्रं टाकली आहेत. पराभवाची चाहूल त्यांना लागली आहे. त्यामुळे जेव्हा पराभव दिसतो, तेव्हा अशा प्रकारची वक्तव्य केली जातात," अशा शब्दांत शिंदे यांनी राजन विचारेंवर निशाणा साधला.

मतदारांना केलं आवाहन 

सर्व नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. "महाराष्ट्रातील पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे. माझं महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावं. आपलं एक मत इतिहास घडवणारं आहे, राष्ट्र घडवणारं आहे. त्यामुळे सर्वांनी मतदान करावं. देशभरातील नागरिक नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी उत्सुक आहेत. महाराष्ट्रातीलही प्रतिक्रिया तशाच आहेत. त्यामुळे नागरिकांनी ऊन होण्याआधी घराबाहेर पडून मतदान करावं," असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

Web Title: cm eknath shinde counterattack on shivsena ubt rajan vichare over bogus voting allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.