अजबच! चोरीचा छडा लावला, चोर पकडला, मुद्देमालही हस्तगत केला, पण मालकाचा पत्ता लागेना, पोलिसही पेचात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 02:01 PM2021-06-13T14:01:10+5:302021-06-13T14:09:24+5:30

Crime News: अनेकदा असे होते की पोलीस चोरांना पकडतात. मात्र या चोरांकडून जप्त करण्यात आलेल्या ऐवजाचा मालक म्हणून कुणी पुढे येत नाही. असाच प्रकार राजधानी नवी दिल्लीजवळ असलेल्या गौतमबुद्धनगर येथे घडला आहे.

अनेकदा असे होते की पोलीस चोरांना पकडतात. मात्र या चोरांकडून जप्त करण्यात आलेल्या ऐवजाचा मालक म्हणून कुणी पुढे येत नाही. असाच प्रकार राजधानी नवी दिल्लीजवळ असलेल्या गौतमबुद्धनगर येथे घडला आहे. येथे पोलिसांनी चोरीच्या एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला. कोट्यवधी रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या चोरांनाही पकडले. मात्र हा ऐवज कुणाचा आहे. याची माहिती पोलिसांना अद्याप मिळालेली नाही.

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात १० चोरांनी एका पॉश सोसायटीमधील फ्लॅटमध्ये घुसून एक मोठी चोरीची घटना घडवून आणली होती. फ्लॅटमधून कोट्यवधीचे सोने, रोख रक्कम, सोन्याची बिस्किटे आणि दोन प्रॉपर्टींची कागदपत्रे असा ऐवज चोरीस गेला होता. मात्र आतापर्यंत या चोरीच्या घटनेबाबत पोलिसांमध्ये कुणी तक्रार दिली नव्हती.

मात्र या प्रकरणाचा उलगडा धक्कादायक पद्धतीने झाला. या चोरीमधून चोरलेल्या पैशांच्या वाटपावरून चोरांमध्ये वादावादी झाली आणि त्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नोएडा पोलिसांनी ६ चोरांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी १४ किलो सोने आणि ५७ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. एकूण ८ कोटी २५ लाख रुपयांचा दस्तऐवज पोलिसांनी जप्त केला. दरम्यान, सर्व आरोपी अद्याप पकडले न गेल्याने चोरी किती कोटींची झाली याची नेमकी माहिती पोलिसांकडे नाही आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार कोट्यवधीचे सोने आणि रोख रकमेवर दावा करण्यासाठी कुणीही पुढे आलेले नाही. पोलिसांनी चोरांकडून ३ किलो सोने आणि ५७ लाख रुपये जप्त केले आहेत. हे सोने आणि रोख रक्कम एका फ्लॅटमध्ये ठेवण्यात आली होती. मात्र जप्त झालेल्या मुद्देमालावर दावा करण्यासाठी कुणी पुढे येत नसल्याने पोलीस बुचकाळ्यात पडले आहेत.

दरम्यान, पोलिसांना प्रयागराजमधील एका वकिलावर संशय आहे. ईडी आणि प्राप्तिकर विभाग या प्रकरणी नोएडा पोलिसांच्या संपर्कात आहे. तसेच आरोपींचीही चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी ६ चोर आणि कोट्यवधीचा मुद्देमाल पकडला आहे. मात्र जप्त ऐवजावर दावा करण्यासाठी कुणीच पुढे येत नाही आहे, असे पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाचा घडले असावे, अशी चर्चा आहे.

आता पोलिसांनी या मालमत्तेच्या मालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. एवढ्या मोठ्या ऐवजाची चोरी झाल्यानंतरही त्याची तक्रार पोलिसांत का करण्यात आली नाही, याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेले कोट्यवधीचे सोने आणि रोख रक्कम हे काळे धन असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत ईडी आणि प्राप्तिकर विभागालाही माहिती देण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्या ठिकाणी चोरी झाली आहे त्या सोसायटीचे २०२० पासूनचे सर्व रेकॉर्ड्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा फ्लॅट एका पिता-पुत्राच्या नावावर आहे. त्यांच्याविरोधात दिल्ली आणि गुरुग्राममध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सध्या हे बाप-लेक भारताबाहेर परदेशात कुठेतरी राहत आहेत.

अॅडिशनल डीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, कोट्यवधीची रक्कम जप्त झाली आहे. ६ आरोपींना अटक झाली आहे. मात्र या प्रकरणातील मास्टरमाईंड अद्याप फरार आहे. स्पष्टपणे सांगायचं तर हा ऐवज हे काळेधन आहे. ज्या प्लॅटमधून हे पैसे जप्त झालेत तो फ्लॅट राममणी पांडे आणि त्यांचा मुलगा किसलय पांडे यांच्या नावावर आहे. सध्या दोघेही परदेशात आहेत. यापैकी मुलगा हा सुप्रिम कोर्टात वकील आहे. दरम्यान, फ्लॅटची माहिती समजू शकली नाही कारण या प्रकरणातील मास्टरमाईंड एका व्यक्तीला घेऊन सोसायटीत गेला जो चावीवाला होता. त्यानंतर फ्लॅटमधून अनेक बॅग बाहेर आणल्या गेल्या.

दरम्यान, सध्या पोलिसांकडून या प्रकरणातील अनेक मुद्द्यांचा शोध घेतला जात आहे. सोसायटीमधील त्या निनावी फ्लॅटमध्ये कुठले बेकायदेशीर काम सुरू होते का, या फ्लॅटचे मालक असलेले पिता-पुत्र समोर का येत नाहीत. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.