गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 10:42 IST2025-07-06T10:42:30+5:302025-07-06T10:42:53+5:30
मुकेश नावाच्या एका घरकाम करणाऱ्या नोकराने त्याच घरातील महिला रुचिका आणि तिचा लहान मुलगा क्रिश यांची गळा चिरून हत्या केली.

गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
दिल्लीच्या लाजपत नगर भागात अलीकडेच एक धक्कादायक घटना घडली होती, जिचा तपास सध्या सुरू आहे. मुकेश नावाच्या एका घरकाम करणाऱ्या नोकराने त्याच घरातील महिला रुचिका आणि तिचा लहान मुलगा क्रिश यांची गळा चिरून हत्या केली. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान आता आरोपीने धक्कादायक खुलासा केला आहे.
पोलिसांनी आरोपी मुकेशला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. चौकशीत त्याने सांगितले की, त्याने प्रथम रुचिकाचा गळा चिरला आणि नंतर तिच्या मुलावर वार केला. क्रिशचा गळा त्याच्या खोलीत चिरण्यात आला. मात्र, मुकेश घरातून बाहेर पडला, तेव्हा क्रिश जिवंत होता.
क्रिश बाथरूममध्ये कसा पोहोचला?
पोलिसांनी सांगितले की, जखमी अवस्थेत क्रिश पाणी प्यायला किंवा स्वतःला वाचवायला बाथरूमकडे गेला असावा. मात्र, तिथेच त्याचा मृत्यू झाला.
का केली माय-लेकाची हत्या?
मुकेशने पोलिसांना सांगितले की, रुचिका आणि तिचा पती सतत त्याच्याकडे त्याने उधार घेतलेले ४५ हजार रुपये आणि दोन मोबाईल मागत होते. तसेच, त्यांनी त्याला फटकारले होते आणि कामावरून काढून टाकण्याची धमकीही दिली होती. या रागातूनच त्याने खून केल्याचे मान्य केले आहे. त्याने खून करण्यासाठी घरातीलच स्वयंपाकघरातील चाकू वापरला.
हत्या केल्यानंतर पळून गेला!
दोघांची हत्या केल्यानंतर मुकेश दिल्लीहून पळून गेला आणि बिहारच्या दिशेने निघाला. मात्र, तो मुगलसराय रेल्वे स्थानकावर पोहोचताच पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, रुचिकाच्या कुटुंबाने मुकेशला कामावर ठेवताना त्याची पोलीस तपासणी केली नव्हती. त्यामुळे असे घातक प्रकार टाळण्यासाठी अशा प्रक्रियांचे पालन करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.