उत्तर प्रदेशातील बरेली येथे राहणाऱ्या हुमा परवीनची यशोगाथा हार न मानण्याची जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची आहे. तिचं म्हणणं आहे की, "प्रयत्न करत राहा, सोडू नका, फक्त हार मानू नका, एक दिवस यश नक्की मिळेल." स्वतः हुमा देखील तोपर्यंत थांबली नाही जोपर्यंत तिने आपलं ध्येय गाठलं नाही.
हुमा परवीन उत्तर प्रदेशातील बरेलीच्या बहेडी गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येते. तिचे पती फरिदाबादमध्ये एका खासगी कंपनीत असिस्टंट मॅनेजर आहेत. हुमा स्वतः देखील हरियाणातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत (MNC) फंक्शनल टेस्टर म्हणून कार्यरत होती. आयटी (IT) क्षेत्रात १० वर्षे काम केलं. याच दरम्यान तिचं लग्न झालं आणि ती आई झाली. मुलीला जन्म देण्यापूर्वी तिच्या आयुष्यात असं एक वळण आलं, ज्याने तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं.
मॅटर्निटी लीव्ह दरम्यान तयारी
हुमाने आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मापूर्वी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (UPPCS) परीक्षेची तयारी सुरू केली होती. एका मुलाखतीत सांगितलं की, जेव्हा ती मॅटर्निटी लीव्हवर होती, तेव्हा तिच्या पतीने तिला काहीतरी नवीन करून पाहण्याचा सल्ला दिला. तेव्हा तिने पहिल्यांदा यूपी पीसीएस परीक्षेचा विचार केला आणि अभ्यासाला सुरुवात केली.
सलग दोन वर्षे अपयश
हुमा परवीनने २०१९ मध्ये पहिल्यांदा यूपी पीसीएस परीक्षा दिली. पहिल्या प्रयत्नात ती प्रीलिम्स उत्तीर्ण होऊ शकली नाही. सुटी संपल्यानंतर नोकरी पुन्हा सुरू झाली होती. एका बाजूला खासगी नोकरी आणि दुसऱ्या बाजूला पतीसोबत पाहिलेलं ते स्वप्न. नोकरी सांभाळत अभ्यास केला आणि २०२० मध्ये दुसऱ्यांदा परीक्षा दिली, पण पुन्हा पदरी निराशाच आली. तरीही मागे हटली नाही.
२०२१ मध्ये काही गुणांनी हुकली संधी
दोन वर्षे सलग अपयश आल्यानंतर २०२१ मध्ये हुमा पूर्व परीक्षेत यशस्वी झाली. मुख्य परीक्षेसाठी तिने सर्वस्व पणाला लावलं. तासनतास अभ्यास केला, पण काही गुणांच्या कमतरतेमुळे ती यशस्वी होऊ शकली नाही. याच काळात ती दुसऱ्यांदा आई झाली. दोन मुलींची जबाबदारी आणि दुसरीकडे पीसीएसची तयारी. २०२२ आणि २०२३ मध्येही परीक्षा दिली, पण अपयश आलं.
पाच वेळा अपयश
पाच वेळा अपयश आल्यानंतरही हुमा खचली नाही आणि हीच तिची ताकद बनली. सतत आपल्या चुका सुधारण्यावर काम करत राहिल्या. सकाळी लवकर उठून घरकाम करणं, दोन्ही मुलींची जबाबदारी सांभाळणं आणि अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करणं असा तिचा दिनक्रम होता. तिने सांगितलं की, रात्री ९ वाजेपर्यंत नोकरी करायची. त्यानंतर स्वयंपाक करताना ऑनलाईन व्हिडीओ पाहायची.
पतीने दिली खूप साथ
किचनमध्ये काम करता करता व्हिडीओ ऐकून त्या विषयांची उजळणी करायची. या काळात पतीने खूप साथ दिली. अनेकदा स्वयंपाक करण्यात मदत केली. रात्री १०:३० वाजता मुलींना झोपवल्यानंतर ती एक कप 'स्ट्राँग कॉफी' घेऊन अभ्यासाला बसायची अशा प्रकारे २४ तासांतून त्या केवळ २ ते ३ तास अभ्यासासाठी काढू शकत होती. अखेर कष्टाचं फळ मिळालं आणि सहाव्या प्रयत्नात ती अधिकारी झाली.
