पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 15:48 IST2026-05-13T15:47:13+5:302026-05-13T15:48:34+5:30
पूर्णियामध्ये पत्नीने आपल्या दोन प्रियकरांच्या मदतीने पतीची हत्या केली. बेपत्ता झाल्याचे नाटक करणाऱ्या पत्नीचा पर्दाफाश पोलिसांनी कॉल लिस्टवरून केला.

AI Generated Image
नात्यांना काळिमा फासणारी एक संतापजनक घटना बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातून समोर आली आहे. आपल्या पतीच्या मृत्यूवर पोलीस ठाण्यात येऊन मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या पत्नीचा खोटेपणा पोलिसांनी उघड केला आहे. ५ मे रोजी बेपत्ता झालेल्या राजेंद्र मंडल नावाच्या व्यक्तीचा मृतदेह जेव्हा कालव्याच्या कडेला सापडला, तेव्हा ही केवळ गुन्हेगारी घटना वाटली होती. मात्र, जेव्हा पोलिसांनी पत्नीच्या मोबाईलची कॉल लिस्ट तपासली, तेव्हा खुनाचा असा काही राज उघड झाला की स्वतः पोलीसही चक्रावून गेले.
नेमकं प्रकरण काय?
पूर्णिया जिल्ह्यातील जानकीनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रमजानी गावातील राजेंद्र मंडल हे बिहारबाहेर मजुरीचे काम करायचे. नुकतेच घर बांधण्यासाठी ते गावी आले होते. मात्र, ५ मे रोजी ते अचानक बेपत्ता झाले. त्यांची पत्नी गणिता देवी हिने पोलीस ठाण्यात जाऊन पती हरवल्याची तक्रार दिली. तक्रार देताना तिचे रडून रडून हाल होत होते, ज्यामुळे कोणालाही तिच्यावर संशय आला नाही.
काही दिवसांनंतर हळदीवाडी गावाजवळील एका कालव्यात दुर्गंधी येत असल्याने ग्रामस्थांनी तिथे पाहिले, असता एक कुजलेला मृतदेह सापडला. गणिता देवीने या मृतदेहाची ओळख आपला पती राजेंद्र म्हणून पटवली आणि पुन्हा एकदा जोरात रडण्यास सुरुवात केली.
पत्नीचे दोन प्रियकर आणि खुनाचं कारस्थान
पोलीस तपासात एक महत्त्वाची बाब समोर आली की, घटनेच्या एक दिवस आधी राजेंद्रने गणिताला मारहाण केली होती. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असता, गणिता देवी सतत दोन मोबाईल क्रमांकावर बोलत असल्याचे आढळले. हे दोन्ही नंबर खुनाच्या दिवशी त्याच परिसरात सक्रिय होते.
पोलिसांनी जेव्हा गणितासह सुमन कुमार आणि रंजीत कुमार रॉय या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा धक्कादायक सत्य बाहेर आले. राजेंद्र बाहेर असताना गणिताचे गावातील या दोन तरुणांशी प्रेमसंबंध होते. राजेंद्र घरी आल्यावर त्याला संशय आला. तसेच राजेंद्रने घर बांधण्यासाठी गणिताला दिलेले पैसे तिने आपल्या प्रियकरांवर खर्च केले होते. यावरून दोघांमध्ये वाद होऊन राजेंद्रने तिला मारहाण केली होती.
असा रचला खुनाचा सापळा
मारहाणीचा बदला घेण्यासाठी गणिताने आपल्या दोन्ही प्रियकरांसोबत मिळून राजेंद्रला संपवण्याचा कट रचला. राजेंद्र जेव्हा बाजारातून परत येत होता, तेव्हा या दोन्ही प्रियकरांनी त्याला वाटेत गाठले. त्यांनी राजेंद्रला भरपूर दारू पाजली आणि तो नशेत असताना त्याला कालव्याच्या निर्जन स्थळी नेऊन त्याची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर गणिताने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन पती बेपत्ता झाल्याचे नाटक रचले.
तिघांनाही बेड्या
एसडीपीओ शैलेश प्रीतम यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, प्रेमसंबंध आणि कौटुंबिक वाद यातूनच हा खून झाला आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी गणिता देवी आणि तिचे दोन्ही प्रियकर सुमन व रंजीत यांना अटक केली आहे. तिघांनीही आपला गुन्हा कबूल केला असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.