लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 11:49 IST2025-07-06T11:47:58+5:302025-07-06T11:49:08+5:30
Ashadhi Ekadashi 2025 : रुग्णालयात उपचार सुरू असताना देखील इस्लामपूर येथील यशवंत हायस्कूलमधील चिमुकल्याने तुळशीच्या पानावर विठूरायाचे चित्र साकारले.

लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र
रेठरे धरण: लिव्हरला सूज, हाताला सलाईन रुग्णालयात उपचार सुरू असताना देखील इस्लामपूर येथील यशवंत हायस्कूलमधील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी आरव अरविंद कोळी याने आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुळशीच्या पानावर ॲक्रेलिक रंगांचा वापर करून विठ्ठलाचे आकर्षक चित्र रेखाटले. अर्ध्या तासात त्याने विठ्ठलाचे चित्र साकारले.
आरवच्या लिव्हरला सूज आल्याने तो इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याने आपल्या वडिलांना विठ्ठलाचे चित्र काढणार असल्याचा आग्रह धरला होता. आरवने फक्त २.५ सेमी x ३ सेमी आकाराच्या तुळशीच्या पानावर ॲक्रेलिक रंगांचा वापर करून विठ्ठलाचे आकर्षक चित्र रेखाटले आहे. यासाठी त्याला अर्ध्या तासाचा कालावधी लागला.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलावरची भक्ती आणि चित्रकलेची आवड यांचा सुंदर संगम आरवने या कृतीतून साधला आहे. लहान व नाजूक पानावर इतक्या सुंदर आणि सूक्ष्म रेखाटन करणे ही कौशल्याची बाब असून, आरवच्या या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे. वडील अरविंद कोळी सर हे चित्रकलेचे शिक्षक असलेने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आरवने चित्रकलेत प्राविण्य मिळविले आहे.