त्या तरुणींनी हॉटेल रुममध्ये धुडगुस घातलेला, मित्रही आलेले; हॉटेल मॅनेजरच्या खुलाशाने दिल्ली पोलीस हबकले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 01:52 PM2023-01-03T13:52:15+5:302023-01-03T14:00:02+5:30

दिल्लीतील या तरुणी एका हॉटेलमध्ये थर्टीफर्स्टची पार्टी करण्यासाठी गेल्या होत्या. ते हॉटेल कपलना खोल्या भाड्याने देते. अशा हॉटेलमध्ये या तरुणींना त्यांचे काही मित्र भेटायला आले होते.

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी दिल्लीवाल्यांनी १ कोटींहून अधिक दारुच्या बाटल्या रिकाम्या केल्या. एवढ्या नशेत दिल्लीवाले असताना त्याच रात्री दिल्लीत एक मोठी घटना घडली. पाच जणांच्या कारने एका तरुणीला १२ किमी फरफटवले. एवढे की तिच्या अंगावरचे कपडे गळून पडले, पाय तुटून पडले होते. यामुळे देशभरात आक्रोश सुरु असताना त्या तरुणी ज्या हॉटेलमध्ये थर्टी फर्स्ट आणि बर्थ डे करण्यासाठी गेल्या होत्या त्याच्या मॅनेजरने जी कहानी सांगितली आहे, ती धक्कादायक आहे.

अपघातावेळी अंजली एकटीच नव्हती तर तिच्यासोबत तिची एक मैत्रिणही होती. या दिल्लीतील एका हॉटेलमध्ये थर्टीफर्स्टची पार्टी करण्यासाठी गेल्या होत्या. ते हॉटेल कपलना खोल्या भाड्याने देते. अशा हॉटेलमध्ये या तरुणींना त्यांचे काही मित्र भेटायला आले होते. या हॉटेलच्या खोलीमध्ये या तरुणींनी दारु पिऊन धुडगुस घातला होता, असे पोलीस चौकशीत समोर येत आहे.

या हॉटेलचा नाईटचा मॅनेजर अमित आता समोर आला आहे. त्याच्या दाव्यानुसार अंजली आणि तिची मैत्रिण संध्याकाळी साडेसातनंतर हॉटेलमध्ये आल्या होत्या. रात्री सव्वा एकच्या सुमारास त्या तेथून निघाल्या होत्या. या तरुणींना त्यांचे काही मित्र भेटण्यासाठी आले होते.

खोलीत या दोन तरुणींमध्ये जोरदार भांडण सुरु झाले होते. दारु पिऊन मोठमोठ्याने गोंधळ घातल्याने हॉटेलच्या स्टाफने त्यांना हॉटेलबाहेर हाकलले होते. खाली आल्यानंतरही दोन्ही तरुणी वाद घालतच होत्या. यामुळे त्यांच्या आजुबाजुच्या लोकांनी त्यांना रोखले. तेव्हा त्या तिथून स्कुटीवर बसून निघून गेल्या. या तरुणींनी शिवीगाळ केली होती, असे हॉटेलचा स्टाफ रोहितने सांगितले.

दिल्ली पोलिसांना हॉटेलच्या बाहेरून तरुणी स्कूटीवरून जातानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे कारमधील पाच तरुणांप्रमाणे या तरुणीदेखील मद्यपान करून गाडी चालवत होत्या. अपघात झाला तेव्हा अंजलीच्या मागे बसलेली तिची मैत्रिण तिथून पसार झाली.

या साऱ्या प्रकरणाच्या कड्या जोडताना दिल्ली पोलिसांसमोर एकेक कोडी सुटायची सोडून वाढतच चालली आहेत. एकीकडे त्या तरुणांनी आपण मद्यधुंद होतो, अंजली कारखाली अडकल्याचे दिसले नाही असे सांगितले आहे.

दुसरीकडे अंजलीची ती हॉटेलमध्ये धुडगुस घालणारी मैत्रिण अपघात होताच तिथून पसार झाली. तीने तसे का केले? तिने अंजलीला तिथेच का सोडले? अंजलीला कारखालून बाहेर का काढले नाही? कारमधील तरुणांना तिने सांगितले का नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

अंजलीच्या मैत्रिणीने जर तेव्हाच कारमधील तरुणांना कळविले असते, तर कदाचित अंजली आज जिवंत असली असती. तिला दुखापत झाली असती व तिच्यावर वेळीच उपचारही करता आले असते. या साऱ्या मर्डर मिस्ट्रीमध्ये पोलिसांची पुरती दमछाक होणार आहे.