भारताचा दणदणीत विजय! Smriti Mandhana ची ऐतिहासिक कामगिरी, नोंदवले ७ विक्रम

INDW vs SAW : भारतीय महिला संघाने पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघावर १४३ धावांनी विजय मिळवला. स्मृती मानधनाच्या ११७ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने ८ बाद २६५ धावा उभ्या केल्या, प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संपूर्ण संघ ३७.४ षटकांत १२२ धावांत तंबूत परतला. आशा शोभानाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्माने दोन बळी टिपले.

स्मृती मानधनाने या सामन्यात १२७ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारांसह ११७ धावा केल्या. दीप्ती शर्मा ( ३७ ) व पुजा वस्त्राकर ( ३१) यांनी तिला चांगली साथ दिली. स्मृती मानधनाचे हे घरच्या मैदानावरील पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठरले. यापूर्वीची तिची सहा शतकं ही भारताबाहेर झाली आहेत.

स्मृती मानधनाचे हे वन डे क्रिकेटमधील सहावे शतक ठरले आणि भारताकडून सर्वाधिक वन डे शतकं झळकावणाऱ्या भारतीय महिला खेळाडूंमध्ये मिताली राज ( ७) अव्वल स्थानी आहे. स्मृतीने आज कर्णधार हरमनप्रीत कौरला ( ५) मागे टाकले. पूनम राऊतच्या नावावर ३, तर जया शर्मा व थिरुश कामिनी यांच्या नावावर प्रत्येकी दोन शतकं आहेत.

वन डे क्रिकेटमध्ये भारतीय मैदानांवर सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये स्मृती मानधना ( १२३०) तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. तिने जया शर्माला ( ११४८) मागे टाकले. मिताली राज ( २८३३) व हरमनप्रीत कौर ( १३१० ) या स्मृतीच्या पुढे आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा विक्रम स्मृती मानधनाच्या नावावर आहे. तिने २०१८ मध्ये किम्बर्ली येथे १३५ धावा केल्या होत्या आणि त्यानंतर तिच्या आजच्या ११७ धावांच्या खेळीचा विक्रम येतो. पुनम राऊतने २०२१ मध्ये लखनौ येथे नाबाद १०४ धावा केल्या होत्या.

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिल्या वहिल्या शतकवीर महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा विक्रम स्मृती मानधनाच्या नावावर नोंदवला गेला आहे. तिने आज आफ्रिकेविरुद्ध ११७ धावा केल्या. यापूर्वी १९९७ मध्ये इंग्लंडची बेलिंडा क्लार्कने वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद ९३ धावा केल्या होत्या.

वन डे क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होम आणि अवे अशी दोन शतकं झळकावणारी स्मृती मानधना ही इंग्लंडच्या चार्लोट एडवर्ड्स नंतर दुसरी महिला खेळाडू ठरली.

घरच्या मैदानावर भारतीय महिला क्रिकेटपटूने वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा विक्रम स्मृतीने नावावर केला. यापूर्वी २०११ मध्ये मिताली राजने वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद १०९ धावा केल्या होत्या.