ओला-उबरला जोरदार टक्कर! आता स्वस्त दरात करा प्रवास; ‘भारत टॅक्सी अॅप’चे आज होणार लाँचिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 10:29 IST2026-02-05T10:07:12+5:302026-02-05T10:29:28+5:30
Bharat Taxi App : तुम्हाला प्रवासासाठी ओला-उबर महाग वाटत असेल तर तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे. देशाच्या वाहतूक क्षेत्रात आज एक मोठी क्रांती होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज ‘भारत टॅक्सी अॅप’ या देशातील पहिल्या सहकारी टॅक्सी सेवेचे उद्घाटन करणार आहेत.

हे अॅप केवळ एक टॅक्सी सेवा नसून ‘ड्रायव्हर-ओनरशिप’ मॉडेलवर आधारित एक सहकारी संस्था आहे. ६ जून २०२५ रोजी स्थापन झालेल्या या प्लॅटफॉर्मशी आतापर्यंत ३ लाखांहून अधिक ड्रायव्हर्स आणि १ लाख ग्राहक जोडले गेले आहेत.

खाजगी कंपन्यांमध्ये ड्रायव्हर्सना त्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा कमिशन म्हणून द्यावा लागतो. मात्र, ‘भारत टॅक्सी’मध्ये ड्रायव्हर्सकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही. संपूर्ण भाड्याची रक्कम थेट ड्रायव्हरला मिळेल.

या सहकारी संस्थेत प्रत्येक ड्रायव्हरला ५ शेअर्स दिले जातील, ज्यामुळे ते या प्लॅटफॉर्मचे भागधारक आणि मालक बनतील. ड्रायव्हर्सना फक्त एक अत्यल्प मेंबरशिप फी द्यावी लागेल, जी ते दिवसाला, आठवड्याला किंवा महिन्याला भरू शकतात.

खाजगी टॅक्सी अॅग्रीगेटर्सच्या तुलनेत भारत टॅक्सीचे भाडे ३० टक्क्यांपर्यंत स्वस्त असणार आहे. यामुळे सामान्यांच्या खिशाला मोठा दिलासा मिळेल.

पाऊस, गर्दी किंवा मागणी वाढली की खाजगी कंपन्या भाड्यात दुपटीने वाढ करतात. मात्र, भारत टॅक्सीमध्ये ‘सर्ज प्राईसिंग’ नसेल. प्रवाशांना नेहमी पारदर्शक आणि आधीच ठरवलेल्या दरात प्रवास करता येईल.

या प्लॅटफॉर्मशी जोडल्या जाणाऱ्या ड्रायव्हर्सना ५ लाखांचा वैयक्तिक अपघात विमा आणि ५ लाखांचा कौटुंबिक आरोग्य विमा दिला जाईल. कामासोबतच त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजीही घेतली जाणार आहे.

मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी कायद्यांतर्गत, ड्रायव्हर्सना नवीन गाडी खरेदी करण्यासाठी सोप्या हप्त्यांवर कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. यामुळे ड्रायव्हर्स आत्मनिर्भर होऊन स्वतःच्या मालकीची गाडी घेऊ शकतील.

सुरुवातीला ही सेवा दिल्ली-एनसीआरमध्ये सुरू केली जात आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नई यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये ही सेवा टप्प्याटप्प्याने विस्तारली जाईल.

















