Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 08:27 IST2026-05-19T08:25:02+5:302026-05-19T08:27:05+5:30
भोपाळमधील बहुचर्चित ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात नवीन आणि धक्कादायक खुलासे झाले आहेत. "दीदी, या मला नेहमी कंट्रोल करतात..." असं ट्विशाने तिच्या बहिणीला सांगितले होते.

Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
Bhopal Twisha Sharma Case: मध्य प्रदेशातील भोपाळ येथील बहुचर्चित 'ट्विशा शर्मा डेथ मिस्ट्री' प्रकरणात दररोज अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारे खुलासे होत आहेत. ट्विशाच्या सासरच्या छळाची आणि घुसमटलेल्या आयुष्याची अशी काही माहिती समोर येत आहे, जी साफ इशारा करतेय की तिचे आयुष्य नरक बनले होते. ट्विशाला न्याय मिळवून देण्यासाठी तिचे नातेवाईक रस्त्यावर उतरले आहेत. याच दरम्यान, ट्विशाची चुलत बहीण प्रियंका आणि तिच्या मावशीने तिच्या शेवटच्या दिवसांतील छळाची कहाणी सांगत गंभीर आरोप केले आहेत.
ट्विशा पूर्वी नोएडामध्ये एका चांगल्या पदावर नोकरी करत होती. मात्र, लग्नानंतर तिने नोकरी सोडली होती. लग्नाच्या अवघ्या ५ महिन्यांतच तिचा संशयास्पद मृत्यू झाला असून, कुटुंबीयांनी हा आत्महत्येचा प्रकार नसून सरळ सरळ हत्या असल्याचा दावा केला आहे.
५ महिन्यांत घटले १५ किलो वजन; सासूचे अजब नियम
ट्विशाची चुलत बहीण प्रियंकाने सांगितले की, "११ मार्च रोजी पुणे येथे एका लग्नाच्या कार्यक्रमात आम्ही ट्विशाला भेटलो होतो. तिथे ती तिच्या सासूसोबत आली होती. तिला पाहताच आम्हाला मोठा धक्का बसला, कारण ती प्रचंड बारीक झाली होती. मी तिला विचारले, 'टुकटुक, तुला काय झाले आहे?' तेव्हा तिने सांगितले की, सासरच्या घरात काही अजब नियम आहेत. तिथे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरनंतर प्रत्येकी एक तास सक्तीने चालावे लागते. याच त्रासामुळे तिचे वजन खूप कमी झाले होते. प्रत्यक्षात सासरचे लोक तिला नीट जेवणही देत नव्हते, ज्यामुळे ५ महिन्यांत तिचे १५ किलो वजन घटले होते."
प्रियंकाने पुढे सांगितले, "पुण्यातील कार्यक्रमातही ट्विशाची सासू तिच्या प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करत होती. तेव्हा अत्यंत हताश होऊन ट्विशा मला म्हणाली होती, 'दीदी, माहीत नाही सासूबाईंना काय प्रॉब्लेम आहे... या मला प्रत्येक ठिकाणी फक्त कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. असं सगळीकडे चालत नाही.' आम्ही त्या वेळी तिची समजूत काढली होती, पण तिची मानसिक कोंडी झाली होती."
'I Am Trapped' आणि १० मिनिटांत खेळ खलास!
ट्विशाच्या कुटुंबीयांच्या मते, हा आत्महत्येचा प्रकार नाही. सदर घटनेच्या दिवशी सकाळी १०:०५ वाजता ट्विशाने तिच्या आईशी फोनवर अगदी व्यवस्थित संवाद साधला होता. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत तिने तिची चुलत बहीण मीनाक्षीला व्हॉट्सॲपवर "I Am Trapped" (मी जाळ्यात अडकले आहे/संकटात आहे) असा मेसेज पाठवला. आता कुटुंबीयांचा असा प्रश्न आहे की, आईशी हसून बोलणारी मुलगी अवघ्या १० मिनिटांत आत्महत्येचा विचार कशी करू शकते? हा घातपाताचाच प्रकार आहे.
२० लाखांची मागणी; आईला येण्यापासून रोखले
ट्विशाच्या मावशीने सासरच्या लोकांवर आणखी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, "त्या नराधमांनी आमच्या मुलीवर ड्रग्ज घेण्याचे खोटे आरोप केले. ट्विशाच्या बँक खात्यात २० लाख रुपये होते. तिचा पती समर्थ सिंह तो पैसा त्याच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यासाठी तिच्यावर सतत दबाव टाकत होता. १३ मे रोजी ट्विशाची आई तिला भेटण्यासाठी भोपाळला जाणार होती, पण तिच्या सासूने फोन करून धमकी दिली की, 'जर तुम्ही इथे आलात तर तुमच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त होईल, त्यांचा घटस्फोट होईल.' भीतीने आई गेली नाही आणि त्यानंतर ही दुर्घटना घडली." तीन महिन्यांपूर्वी भावाच्या लग्नात जेव्हा ट्विशा आली होती, तेव्हा ती कमालीची शांत झाली होती. वडिलांना नुकताच हार्ट अटॅक आल्यामुळे तिने आपली कोणतीही अडचण वडिलांना सांगितली नव्हती.
केसमध्ये आतापर्यंत काय घडले?
या हायप्रोफाईल प्रकरणात ट्विशाची सासू गिरिबाला सिंह हिला कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मिळाला आहे. मात्र, सोमवार १८ मे रोजी कोर्टाने मुख्य आरोपी आणि पती समर्थ सिंह याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. ट्विशाच्या मृत्यूनंतर पती समर्थ सिंह फरार असून, पोलीस प्रशासनाने त्याच्यावर १० हजार रुपयांचे इनाम घोषित केले आहे.
तपासावर अविश्वास; दिल्लीत चौकशीची मागणी
ट्विशाच्या कुटुंबीयांनी भोपाळ पोलिसांच्या तपासावर तीव्र अविश्वास दाखवला आहे. सासरचे लोक अत्यंत श्रीमंत आणि प्रभावशाली असून त्यांचे नातेवाईक न्यायव्यवस्थेत मोठ्या पदांवर आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशात या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही, असा आरोप कुटुंबाने केला आहे. हा खटला आणि तपास दिल्लीला वर्ग करण्यात यावा आणि ट्विशाचे शवविच्छेदन पुन्हा एकदा दिल्लीत करण्यात यावे, अशी मागणी आता नातेवाईकांनी केली आहे.