सोन्याची किंमत आकाशाला भिडली, तर RBI नं खरेदीच कमी केली! रिझर्व्ह बँकेकडं आता किती सोनं? कुठे ठेवलंय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 14:03 IST2026-01-21T13:52:50+5:302026-01-21T14:03:28+5:30
खरे तर, जागतिक अस्थिरता आणि सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी, यांमुळे सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत.

जागतिक बाजारात सोन्याच्या किमती अक्षरशः आकाशाला भिडल्या आहेत. सोन्याने १.५० लाख रुपये प्रति १० ग्रॅमचा टप्पा ओलांडला आहे. यानंतर, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आपल्या सुवर्णखरेदीच्या धोरणात मोठा बदल केला असून सोन्याची खरेदी कमी केल्याचे दिसत आहे.

वर्ल्ड गोल्ड काउंन्सिलच्या (WGC) ताज्या अहवालानुसार, आरबीआयने २०२५ मध्ये केवळ ४.०२ टन सोने खरेदी केले होते. जे गेल्या ८ वर्षांचा विचार करता, फारच कमी आहे. २०२४ मध्ये आरबीआयने ७२.६ टन सोने खरेदी केले होते. अर्थात, २०२५ च्या तुलनेत ही खरेदी तब्बल ९४ टक्क्यांनी कमी आहे.

रिझर्व्ह बँकेकडं आता किती सोनं? - रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षात कमी सोने खरेदी केले असले, RBI कडे सोन्याचा विक्रमी साठा आहे. २०२५ च्या अखेरीस, RBI कडे एकूण ८८०.२ टन सोने होते. तर एका वर्षापूर्वी म्हणजेच २०२४ च्या अखेरीस, ८७६.१८ टन एवढे सोने होते.

यामुळेच सोने, हे देशाच्या परकीय चलन साठ्यातील एक महत्त्वाचा घटक बनले आहे. नोव्हेंबर २०२५ पर्यंत, आरबीआयच्या परकीय चलन साठ्यातील सोन्याचे मूल्य १०० अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिक आहे.

कुठे आहे भारताचे सोने? आपल्याला आश्चर्य वाटेल, पण आरबीआयचे सर्वच्या सरव सोने देशात ठेवण्यात आलेले नाही. तर या सोन्याचा मोठा भाग परदेशामध्ये सुरक्षित तिजोरीत ठेवण्यात आला आहे.

५ मे रोजी प्रसिद्ध झालेल्या परकीय चलन राखीव व्यवस्थापनावरील आरबीआयच्या एका अहवालानुसार, भारताच्या एकूण सुवर्णसाठ्यापैकी ५११.९९ टन सोने देशात सुरक्षित आहे.

या शिवाय, उर्वरित ३४८.६२ टन सोने 'बँक ऑफ इंग्लंड' आणि 'बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट' (BIS) यांच्याकडे सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

सोन्याच्या किंमतीचा विचार करता, २०२२ पासून सोन्याच्या दरात सुमारे १७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकट्या २०२५ मध्ये सोन्याच्या किमती ६५ टक्क्यांनी वधारल्या आहेत. खरे तर, जागतिक अस्थिरता आणि सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी, यांमुळे सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत.

















