अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण; पहिल्यांदाच १०० च्या उंबरठ्यावर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 13:54 IST2026-05-18T13:48:23+5:302026-05-18T13:54:12+5:30
Dollar vs Rupee: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १११ डॉलरच्या पार गेल्यामुळे भारताचा आयात खर्च प्रचंड वाढला आहे.

Dollar vs Rupee: आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावाचा थेट फटका भारतीय चलनाला बसला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच सोमवारी (१८ मे) अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे. आज रुपयाने डॉलरच्या तुलनेत ९६.१८ चा आतापर्यंतचा सर्वात नीचांक नोंदवला आहे.

सकाळच्या सत्रात व्यवहारादरम्यान रुपया काही काळासाठी घसरून ९६.१८ प्रति डॉलरवर आला होता, जो त्याच्या मागील बंद भावापेक्षा सुमारे ०.२ टक्क्यांनी कमी आहे. रुपयाची ही घसरण यापूर्वीच्या ९६.१३५० या नीचांकी पातळीच्याही पार गेली आहे. दरम्यान, भारत आपल्या गरजेच्या एकूण वापरापैकी सुमारे ८५ टक्के कच्चे तेल इतर देशांकडून आयात करतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १११ डॉलरच्या पार गेल्यामुळे भारताचा आयात खर्च प्रचंड वाढला आहे.

भारतीय तेल कंपन्यांना या आयातीचे पेमेंट करण्यासाठी डॉलरची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. बाजारात डॉलर खरेदी करण्यासाठी लागलेल्या या स्पर्धेमुळे डॉलर मजबूत होत असून, त्याच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वेगाने घसरत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल'वर इरानला दिलेला कडक इशारा रुपयावर दबाव वाढवणारा ठरला आहे.

ट्रम्प यांनी लिहिले की, "इरानसाठी वेळ वेगाने संपत चालला आहे. त्यांनी करारासाठी वेगाने पावले उचलावीत, अन्यथा त्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. आता वेळ फार कमी आहे." या विधानामुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे. जोखीम टाळण्यासाठी परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून आपले पैसे काढून घेत आहेत आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या अमेरिकन डॉलरमध्ये गुंतवणूक करत आहेत.

रुपया घसरल्यामुळे आता परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. ट्यूशन फी, हॉस्टेलचा खर्च आणि विमानाचे तिकीट यासाठी आता जास्त रुपयांचे रूपांतर डॉलरमध्ये करावे लागेल. तसेच परदेशातील वैद्यकीय उपचारही महाग होतील. भारतात आयात केले जाणारे मोबाईल, लॅपटॉप, लॅपटॉपचे सुटे भाग आणि ऑटोमोबाईल कंपोनेंट्स महाग होणार आहेत.

डॉलर महागल्यामुळे कच्च्या तेलाची आयात महाग होईल. परिणामी देशांतर्गत वाहतूक खर्च वाढेल, ज्यामुळे रोजच्या वापरातील भाजीपाला, दूध आणि किराणा माल महाग होऊन सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. थोडक्यात सांगायचे तर, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागणे आणि ट्रम्प यांच्या विधानामुळे डॉलरची वाढलेली मागणी, या दुहेरी संकटात भारतीय रुपया अडकला असून, याचा अंतिम फटका देशांतर्गत महागाई वाढण्यात होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
















