Anmol Ambani: वयाच्या २४ व्या वर्षीच घेतली एम्पायरची जबाबदारी; अनमोल अंबानींच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 01:32 PM2022-02-21T13:32:22+5:302022-02-21T13:44:21+5:30

उद्योगपती अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचे सुपुत्र अनमोल अंबानी यांचा विवाह सोहळ्या मोठ्या थाटात पार पडला. अनमोल अंबानी नेमकं काय करतात आणि त्यांच्याबाबतच्या अशा काही खास गोष्टी जाणून घेऊयात ज्या खूप कमी जणांना माहित असतील.

उद्योगपती अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचे सुपुत्र अनमोल अंबानी यांचा २० फेब्रुवारी रोजी विवाह सोहळा संपन्न झाला. अनमोल अंबनी कृशा शाह सोबत विवाह बंधनात अडकले.

अंबानी कुटुंबीय त्यांचं वैयक्तिक आयुष्य कॅमेरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आले आहेत. त्यातच अनमोल अंबानी देखील प्रसिद्धीपासून खूप दूर राहत आले आहेत. अनमोल नक्की काय करतात आणि ते एक व्यक्ती म्हणून कसे आहेत याबाबत जाणून घेऊयात.

अनमोल अंबानी यांचा जन्म १२ डिसेंबर १९९१ मध्ये झाला. त्यांनी मुंबईतील कॅथेट्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून इयत्ता १० वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानतंर ते यूके येथील सेवेन ओक्स स्कूलमध्ये शिक्षणासाठी गेले. अनमोल यांनी यूकेच्या वॉरविक बिझनेस स्कूलमधून मॅनेजमेंट विषयात बीएससी केलं आहे.

रिलायन्स म्युच्युअल फंडमध्येही अनमोल अंबानी यांनी काही महिने इंटर्नशीप देखील केली होती. यादरम्यान ते फंड हाऊसच्या रिसर्च डिपार्टमेंटसोबत काम करत होते.

अनमोल अंबानी हे अनिल आणि टीना अंबानी यांचे थोरले सुपुत्र आहेत. ऑगस्ट २०१६ साली जेव्हा अनमोल अंबानी यांना अतिरिक्त संचालक पदावर रिलायन्स कॅपिटलच्या संचालक मंडळात सामील केलं गेलं तेव्हा ते अवघ्या २४ वर्षांचे होते. वयाच्या २४ व्या वर्षापर्यंत अनमोल अंबानी यांनी फायनान्शियल सर्व्हिसेस बिझनेस ऑफ द कंपनीमध्ये काम पाहिलं. ही कंपनी आता नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलसोबत जोडली गेली आहे.

रिलायन्स कॅपिटल कंपनी एकेकाळी विमा आणि म्युच्युअल फंडसह प्रमुख क्षेत्रांमध्ये सहाय्यक कंपन्यांसोबत एक वित्तीय सेवेचं पावरहाऊस म्हणून ओळखली जात होती. अनमोल हे कंपनीच्या संचालक मंडळात सामील होण्याआधीपासूनच ते आपल्या कंपनीसाठी मेहनत घेत होते. इंटरनल बिझनेस रिव्ह्यू मिटिंगमध्ये ते आवर्जुन सहभाग घेत असत.

अनिल अंबानींच्या व्यवसायाला नवं रुप देण्यासाठी अनमोल अंबानी यांनी खूप मेहनत घेतली. अनमोल यांच्यासोबत काम केलेल्या एका व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार, ते अंबानी कुटुंबातील व्यक्ती आहेत आणि कंपनीचे संचालक देखील होते. पण असं असतानाही त्यांच्याशी संपर्क करण आणि संवाद साधणं खूप सोपं होतं. ते नेमही हसतमुख संवाद साधतात आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करत असतात.

अनमोल अंबानी यांनी आजवर अनेक महिला रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले आहेत. एका कर्मचाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, अनमोल अंबानी यांनी महिलांना कॉर्पोरेटच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. विशेषत: पहिल्यांदा माता बनणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुटी आणि वर्क फ्रॉमची सुविधा त्यांनी उपलब्ध करुन दिली. रिलायन्स कॅपिटल कंपनी एक कॉर्पोरेट कंपनी असतानाही त्यांनी क्लाइंटला सामोरे जाणाऱ्या टीम व्यतिरिक्त इतर सर्वांना कॅज्युअल कपडे परिधान करण्यास परवानगी दिली.

अनमोल यांचा दृष्टीकोन खूप व्यावहारिक असून ते सहयोगी कंपन्यांच्या सीईओंशी सातत्यानं संपर्कात असतात, असं एका व्यक्तीनं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं.

Ministry of Corporate Affairs (MCA) च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार अनमोल सध्या तीन कंपन्यांचे संचालक पदावर कार्यरत आहेत. यात Kyzer Estate Private Limited, Kyzer Pursuits Private Limited, Mandke Foundation आणि एक LLP कंपनी जिचं नाव Risee Kubo LLP असं आहे.