शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 23:34 IST

1 / 15
Vaishakh Angarki Sankashti Chaturthi May 2026 Astrology: मराठी वर्षाच्या वैशाख मासात मंगळवार, ०५ मे २०२६ रोजी संकष्ट चतुर्थी अंगारक योग आहे. या दिवशी पहाटे ०५ वाजून २४ मिनिटांनी वैशाख वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्ट चतुर्थी सुरू होत असून, ०६ मे २०२६ रोजी सकाळी ०७ वाजून ५१ मिनिटांपर्यंत संकष्ट चतुर्थी असणार आहे. याचाच अर्थ ही अंगारकी संकष्टी चतुर्थी अहोरात्र असणार आहे.
2 / 15
अंगारक योग वारंवार जुळून येत नाही. चतुर्थीला अंगारक योग जुळून येणे ही दुर्मिळ बाब मानली जाते. त्यामुळेच या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढते असे मानले जाते. मंगळवारी चतुर्थी आली की, अंगारक योग जुळून येतो. मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात याचे संदर्भ आढळून येतात.
3 / 15
या दिवशी हजारो भाविक विशेष व्रत करतात, उपास करतात, आवर्जून गणपती मंदिरात जातात. सन २०२६ च्या दुसऱ्या अंगारक संकष्ट चतुर्थीला बुधादित्य, मालव्य, नवमपंचम असे अनेक राजयोग जुळून येत असल्याचे म्हटले जात आहे. मे महिन्यातील अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणत्या राशीवर कसा प्रभाव राहील? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: सुरुवातीला काही अडचणी जाणवतील. मात्र, परिस्थिती आटोक्यात येईल. आपण आरोग्याची काळजी घ्यावी. वाहन जपून चालवा. त्या बाबतीत अति आत्मविश्वास नको. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. योग्यतेची दखल घेतली जाईल. काही योगायोगाच्या घटना घडतील. सामाजिक मानसन्मान मिळेल. काहींना पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. आवडत्या छंदासाठी वेळ मिळेल.
5 / 15
वृषभ: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. सुरुवात उत्साहात होईल. व्यवसायात भरभराट होईल. नवनवीन प्रयोग करून पाहिले जातील, जीवनसाथीशी सूर जुळतील. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. विवाहेच्छुकांना अनुकूल वातावरण राहील. संयमाने वागण्याची गरज आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या कामात घाई करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. अनुकूलता राहील.
6 / 15
मिथुन: काही कटु, तर काही गोड अनुभव येतील. आक्रमकता टाळण्याची गरज आहे. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. प्रारंभीच्या काळात आपले म्हणणे लोकांना पटवून देण्यात वेळ घालवू नका. अडचणींचे निवारण होईल. मित्र-मैत्रिणींच्या मदतीने कामे होतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. विवाह जुळण्याच्या दृष्टीने हालचाली वेग घेतील. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. संमिश्र ग्रहमान राहील.
7 / 15
कर्क: कार्यक्षेत्रात अनुकूल परिवर्तन होण्याची शक्यता आहे. उच्च पद, अधिकार, मान-सन्मान, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. शब्दाला किंमत दिली जाईल. सुरुवातीला एखाद्या नवीन जबाबदारीत गुंतलेले राहाल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. महत्त्वाच्या योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळली पाहिजे. प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. किरकोळ अडचणी दूर होतील.
8 / 15
सिंह: नावलौकिक वाढेल. सामाजिक कार्यात अग्रेसर राहाल. ग्रहमानाची चांगली साथ राहील. नोकरीत पगारवाढ मिळेल. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. अपेक्षित निरोप येतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. नवीन जबाबदारी मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी. दगदग करू नका. महत्त्वाच्या कामात लोकांच्या भरवशावर विसंबून राहू नका.
9 / 15
कन्या: चंद्राचे भ्रमण अनुकूल राहील. व्यवसायात यश, पर्यटन, नोकरीतील सफलता व प्रगती इत्यादी दृष्टीने चांगली फळे मिळतील. व्यवसायात नवीन प्रयोग करून पाहिले जातील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. मात्र, आर्थिक गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. कार्यक्षेत्रात महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. घरात मंगलमय वातावरण राहील. पाहुणे मंडळी येतील.
10 / 15
तूळ: यश मिळेल. ठरवलेली कामे यशस्वीपणे पूर्ण कराल. लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल. धनलक्ष्मीची कृपा राहील. जवळच्या लोकांच्या सहवासात मजेत वेळ जाईल. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. भावंडांशी सख्य राहील. जवळच्या प्रवासाचे योग येतील. व्यवसायात भरभराट होईल. मात्र, आर्थिक गुंतवणूक करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्यावा. कामात बदल होतील. थोडी धावपळ करावी लागेल.
11 / 15
वृश्चिक: धनलक्ष्मीची कृपा राहील. धनलाभ, मौजमजा, उत्साहवर्धक प्रवास, आनंदी घटना अशा प्रकारची फळे आपल्याला मिळतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल, जीवनसाथीशी सूर जुळतील. मनात सकारात्मक विचार राहतील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद मिळेल. काहींना जवळचा प्रवास होईल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील.
12 / 15
धनु: अनुकूल परिस्थिती राहील. त्यामुळे सुरुवातीला मोठे निर्णय घाईघाईत न घेता कामाची पूर्वतयारी करून ठेवा. परिस्थिती नियंत्रणात येईल. आनंदी घटना घडतील. कामाचा ताण निघून जाईल. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील. प्रेमात असणाऱ्यांनी घरी सांगण्यास हरकत नाही. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. योजना लोकांना आवडतील.
13 / 15
मकर: धनलक्ष्मीची प्रसन्नता राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. जनसंपर्क चांगला राहील. मात्र, संयमाने वागण्याची गरज आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रवासात सतर्क राहा. आपल्या योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळा. अडचणी दूर होतील. जीवनसाथीचा चांगला सहयोग राहील. नोकरीत वर्चस्व राहील. कलाकारांना प्रोत्साहन मिळेल.
14 / 15
कुंभ: एखादी नवीन संधी मिळेल. योग्यतेची वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. मागण्या मान्य केल्या जातील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल. धनलक्ष्मीची कृपा राहील. अनेक उत्तम लाभ होतील. महत्त्वाची कामे हातावेगळी कराल. मात्र, सावधपणे वागण्याची गरज आहे. कुणी तुम्हाला खर्चात पाडतील. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवले पाहिजे.
15 / 15
मीन: चंद्राचे भ्रमण लाभदायक ठरेल. अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात यश मिळेल. अनेक आघाड्यांवर सफलता मिळेल. काही योगायोगाच्या घटना घडतील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. मुलांची प्रगती होईल. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. मान-सन्मान मिळेल. धनलक्ष्मीची कृपा राहील, वडीलधाऱ्या मंडळींकडून आशीर्वाद मिळतील. जमीन जुमल्याची कामे होतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यganpatiगणपती 2025Ganpati Festivalगणपती उत्सव २०२५spiritualअध्यात्मिक