मंगळाचे राशीपरिवर्तन: ९ राशींना बंपर लाभ, यश-प्रगतीच्या संधी; केतु कृपेने ४५ दिवस मंगलमय!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 03:03 PM2023-10-04T15:03:03+5:302023-10-04T15:03:03+5:30

मंगळाचे गोचर काही राशींना उपयुक्त ठरू शकेल. मंगळ-केतुचा युती योगाचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...

ऑक्टोबर महिन्यात बुध आणि शुक्र ग्रहांनंतर आता नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह राशीपरिवर्तन करत आहे. मंगळ ग्रह तूळ राशीत विराजमान झाला असून, १६ नोव्हेंबरपर्यंत मंगळ तूळ राशीत असेल. विशेष म्हणजे तूळ राशीत आताच्या घडीला छाया ग्रह मानला गेलेला केतु विराजमान असून, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीसपर्यंत मंगळ आणि केतुचा युती योग जुळून येत आहे.

मंगळ आणि केतुचा तूळ राशीतील युती योग विशेष मानला जात आहे. दोन्ही उग्र ग्रह मानले जातात. या दोन्ही ग्रहांच्या युतीचा देश-दुनियेवर मोठा प्रभाव पडू शकतो, असे म्हटले जाते. याशिवाय सर्व राशींवरही मंगळाचे तूळ राशीतील गोचर आणि केतुशी युती योग विशेष प्रभावकारी मानला गेला आहे.

मंगळ ग्रह पुढील सुमारे ४५ दिवस तूळ राशीत असेल. मंगळ गोचराचा कोणत्या राशींना कसा फायदा मिळू शकतो, कोणत्या राशीच्या व्यक्तींना सावधगिरीने कामे करायला हवीत, कोणत्या राशींना आगामी काळ मंगलमय ठरू शकेल? जाणून घेऊया...

मेष: करिअरच्या दृष्टीने मंगळाचे गोचर खूप चांगले असणार आहे. करिअरमध्ये खूप शुभ परिणाम मिळतील. मात्र कौटुंबिक जीवनात काळजी घ्यावी लागेल. जोडीदाराशी काही मतभेद होऊ शकतात, नाते दृढ ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

वृषभ: नोकरदार लोकांसाठी आगामी काळ चांगला असेल. नोकरी बदलू शकतात. विरोधकांवरही वर्चस्व गाजवाल. लोकांशी बोलताना सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो.

मिथुन: मंगळाचे गोचर खूप चांगले सिद्ध होऊ शकेल. जे लोक क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत त्यांना चांगले परिणाम मिळतील. या काळात मनोबल उंच राहील, ज्यामुळे प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकाल.

कर्क: आर्थिक बाबतीत आगामी काळ चांगला राहू शकेल. या काळात जमीन किंवा वाहन खरेदी करू शकतात. कामाच्या ठिकाणी चांगले बदल दिसू शकतात. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

सिंह: आत्मविश्वासात चांगली वाढ होऊ शकेल. धैर्य आणि शौर्य वाढेल. या काळात साहसी काम करू शकतात. यासोबतच भावंडांसोबत कुठेतरी फिरायला जायचा प्लान आखला जाऊ शकतो.

कन्या: या काळात बोलण्यात थोडी कठोरता येऊ शकते. बोलताना शब्दांचा अतिशय विचारपूर्वक वापर करावा लागेल. अन्यथा नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो.

तूळ: मंगळाचे गोचर काहीसे संमिश्र ठरू शकेल. आगामी काळात ऊर्जेने भारलेले असाल. आत्मविश्वास उंचावेल. मात्र, मनाची चंचलताही तेवढीच वाढेल. चंचलतेवर नियंत्रण ठेवणे लाभदायक ठरू शकेल. योग, ध्यानधारणा करणे हिताचे ठरेल.

वृश्चिक: मंगळाचे गोचर आर्थिक लाभ मिळवून देणारे सिद्ध होऊ शकेल. परदेशातून आर्थिक लाभ मिळू शकतील. असे असले तरी या काळात खूप काळजीपूर्वक पैसे खर्च करावेत.

धनु: मोठ्या भावंडांचे सहकार्य मिळेल. जे लोक वैद्यकीय क्षेत्र, सैन्य, पोलीस इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना लाभ मिळू शकतो.

मकर: करिअरच्या बाबतीत प्रचंड यश मिळू शकते. या काळात स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

कुंभ: मंगळाचे गोचर संमिश्र ठरू शकेल. गुरू, वडील आणि वडिलांसारख्या लोकांशी विचारपूर्वक बोलले पाहिजे. जोडीदाराच्या कुटुंबाशी चांगले वागण्याचा सल्ला दिला आहे, अन्यथा नातेसंबंधात अंतर येऊ शकते.

मीन: मंगळाचे गोचर धनलाभाचे ठरू शकेल. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. आरोग्याच्या समस्या देऊ शकतो. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्यायाम किंवा योगासने करावीत. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.