Tata Nexon EV Price Update: थँक्स महिंद्रा! टाटा नेक्सॉन ईव्ही पावणे दोन लाखांनी स्वस्त झाली, जुन्या ग्राहकांचीही रेंजही वाढणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 01:32 PM2023-01-18T13:32:57+5:302023-01-18T13:39:51+5:30

दोनच दिवसांपूर्वी महिंद्राने ईलेक्ट्रीक एसयुव्ही ४०० लाँच केली होती. आजवर ईलेक्ट्रीक वाहनांच्या बाजारात दबदबा असलेल्या टाटाच्या नेक्सॉनपेक्षा महिंद्राच्या कारची किंमत स्वस्त होती.

दोनच दिवसांपूर्वी महिंद्राने ईलेक्ट्रीक एसयुव्ही ४०० लाँच केली होती. आजवर ईलेक्ट्रीक वाहनांच्या बाजारात दबदबा असलेल्या टाटाच्या नेक्सॉनपेक्षा महिंद्राच्या कारची किंमत स्वस्त होती. यामुळे टाटाने दुसऱ्याच दिवशी आपल्या ईव्ही कारच्या किंमतीत मोठी 'कपात' केली आहे. शिवाय सॉफ्टवेअर अपडेट देऊन रेंजही वाढविणार आहे.

महिंद्रा अँड महिंद्राने अखेर सोमवारी त्यांच्या बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट SUV XUV400 ची किंमत जाहीर केली. ही इलेक्ट्रीक कार XUV300 कॉम्पॅक्ट एसयुव्हीवर आधारित आहे. EC आणि EL या दोन प्रकारांत ही कार येणार आहे.

Mahindra XUV400 EV ची किंमत रु. 15.99 लाख आणि रु. 18.99 लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. वर्षाला २०००० कार विकल्या जाणार आहेत. एका चार्जवर 456 किमी अंतर कापू शकते.

असे असताना टाटाच्या नेक्सॉनची रेंजही कमी पडत होती आणि किंमतही खूप होत होती. यामुळे टाटाने महिंद्राला टक्कर देण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिकची सुरुवातीची किंमत फक्त 14.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) करण्यात आली आहे.

Tata Nexon EV एकूण दोन प्रकार आणि वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह येते. नवीन अपडेटसह, Tata Nexon EV Prime (बेस मॉडेल) ची किंमत 14.49 लाख रुपये आणि Nexon EV Max ची उच्च आवृत्तीची प्रारंभिक किंमत 16.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) करण्यात आली आहे.

या कार्सची किंमत याआधी अनुक्रमे 14.99 लाख आणि 18.34 लाख रुपयांपासून सुरू होत होती. यामध्ये टाटाने Tata Nexon EV Prime ची किंमत 50 हजारांनी तर Nexon EV Max ची किंमत 1.85 लाख रुपयांनी कमी केली आहे.

एवढ्यावरच टाटा थांबलेली नाही, तर ड्रायव्हिंग रेंजही वाढविण्यात आली आहे. Nexon EV MAX आता एका चार्जमध्ये 453 किमीची रेंज देईल. 25 जानेवारी 2023 पासून ही रेंज मिळेल. नेक्सॉन मॅक्सचे विद्यमान ग्राहकही सॉफ्टवेअर अपग्रेडद्वारे या वाढलेल्या रेंजचा फायदा घेऊ शकणार आहेत.

यासाठी ग्राहकांना त्यांचे वाहन अधिकृत डीलरशिपकडे न्यावे लागेल. विद्यमान ग्राहक 15 फेब्रुवारी 2023 पासून या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.

कंपनीने आज पोर्टफोलिओमध्ये वैशिष्ट्यपूर्ण Nexon EV MAX XM ट्रिम लाँच केले आहे, ज्याची किंमत 16.49 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, स्वयंचलित हवामान नियंत्रण, i-VBAC सह इलेक्ट्रॉनिक स्थिरता कार्यक्रम (ESP), LED DRLs आणि LED टेल लॅम्पसह प्रोजेक्टर हेडलॅम्प, पुश बटण स्टार्ट यांसारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.

Nexon EV MAX XZ+ Lux ची किंमत 18.49 लाख रुपये आहे. याचबरोबत Nexon EV Prime XM देखील लाँच करण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीची किंमत 14.49 लाख रुपयांपासून सुरू होते.