कोणतीही नको; SUVच हवी! ‘बोल्ड’, ‘स्टायलिश’ वाहनांची क्रेझ वाढली; ५ वर्षांत आली ३६ मॉडेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 10:42 AM2022-07-18T10:42:00+5:302022-07-18T10:47:16+5:30

ग्राहकांमध्ये एसयूव्हींची अशी ‘क्रेझ’ आहे की काही लोकप्रिय मॉडेल्स मिळविण्यासाठी लोकांना दोन वर्षांपर्यंत वाट पाहावी लागतेय.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भारतीय वाहनप्रेमींची गेल्या काही वर्षांमध्ये एसयूव्ही (स्पोर्ट युटिलिटी वाहन) वाहनांबद्दलचे प्रेम वाढतच चालले आहे. दमदार कामगिरी, दिसायला आकर्षक, उत्तम मायलेजमुळे वाहनप्रेमी एसयूव्हींच्या प्रेमात पडत असून, कंपन्यांना ग्राहकांना आणखी आवडतील अशा एसयूव्ही तयार करत आहेत.

त्यामुळेच गेल्या पाच वर्षांत तब्बल ३६ एसयूव्ही मॉडेल भारतीय बाजारपेठेत कंपन्यांनी सादर केली आहेत. लोकांमध्ये एसयूव्हींची अशी ‘क्रेझ’ आहे की काही लोकप्रिय मॉडेल्स मिळविण्यासाठी लोकांना दोन वर्षांपर्यंत वाट पाहावी लागतेय.

परंतु, त्यानंतरही रोज नवनव्या ऑर्डरचा वर्षाव होत आहे. कार खरेदीदार वाहनांवर अधिक खर्च करण्यास इच्छुक आहेत आणि सनरूफ आणि संबंधित आधुनिक तंत्रज्ञानासारख्या वैशिष्ट्यांसह वाहनाच्या टॉप-ऑफ-द-लाइन प्रकारांना प्राधान्य देत आहेत.

ज्या मार्केटमध्ये हॅचबॅकची विक्री सर्वाधिक असायची, तिथे एंट्री-लेव्हल आणि मिड-साइज एसयूव्ही अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत आणि त्यामुळेच या श्रेणीत नवीन मॉडेल्स लाँच होत आहेत.

बाजारपेठेतील राजाला टाकले मागे - वाढत्या मागणीसह, एंट्री-लेव्हल एसयूव्ही सेगमेंटने गेल्या आर्थिक वर्षात देशांतर्गत प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेतील सर्वांत मोठा वाटा उचलला असून, २०२१ पासून बाजारपेठेत राज्य करत असलेल्या प्रीमियम हॅचबॅकला मागे टाकले आहे.

गेल्या वर्षी, ३०.६८ लाख युनिट्सपैकी ६.५२ लाख युनिट्स एंट्री-लेव्हल एसयूव्हीच्या होत्या. गेल्या पाच वर्षांत, प्रवासी वाहन विभागातील बहुतेक मॉडेल्स कॉम्पॅक्ट आणि मिड-रेंज एसयूव्हीचे होते.

मागणीत किती वाढ? - मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक (विक्री आणि विपणन) शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, एसयूव्ही सेगमेंटमध्ये गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. उद्योगातील एसयूव्हीचे योगदान, जे पूर्वी सुमारे १९ टक्के होते, ते २०२१-२२ मध्ये ४० टक्क्यांपर्यंत वाढले आहे आणि ते आणखी वाढत आहे.

का झाली वाढ? - टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र म्हणाले की, विविध डिझाइन, बदलती जीवनशैली, साथीच्या आजारामुळे सार्वजनिक वाहतुकीऐवजी खासगी वाहनांकडे जाण्याचा कल, सुरक्षिततेबद्दल वाढती जागरूकता आणि सोयी-सुविधांची मागणी या घटकांमुळे वाहन बाजारामध्ये वाढ होत आहे.

कंपन्याही स्पर्धेत - किआ इंडियाचे मुख्य विक्री अधिकारी म्युंग-सिक सोन यांनी सांगितले की, भारतीयांमध्ये एसयूव्हीची मागणी सातत्याने वाढत आहे. यावरून भारतीयांना ‘बोल्ड’ आणि ‘स्टायलिश’ वाहने हवी आहेत, असे दिसते. त्यामुळे कंपन्यानी नवे वाहन बाजारात उतरवत आहेत.

पुढील ०२ वर्षांपर्यंत लोकांना एसयूव्हीसाठी सध्या वेटिंग आहे. ४० टक्क्यांपर्यंत एसयूव्हीची मागणी २०२१-२२ मध्ये पोहोचली आहे.

३०.६८ लाख युनिट्सपैकी ६.५२ लाख युनिट्सच्या केवळ एसयूव्हीच्या ५ वर्षांत प्रवासी वाहन विभागात बहुतेक मॉडेल्स कॉम्पॅक्ट आणि मिडरेंज एसयूव्हीचे २०२१ मध्ये एसयूव्हींनी बाजारपेठेत राज्य करत असलेल्या हॅचबॅकला टाकले मागे.

का आवडतेय एसयूव्ही? - दमदार कामगिरी - दिसायला आकर्षक - उत्तम मायलेज - सनरूफ, संबंधित आधुनिक तंत्रज्ञान - ‘बोल्ड’ आणि ‘स्टायलिश’