PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 04:15 PM2024-05-18T16:15:02+5:302024-05-18T16:20:17+5:30

Narendra Modi Rally : लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीतील ही पहिलीच सभा असणार आहे.

pm narendra modi rally north east delhi diplomats from countries lok sabha elections 2024  | PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीत मोठी सभा होणार आहे. नरेंद्र मोदींची ही सभा पाहण्यासाठी १३ देशांतील २५ हून अधिक राजदूत येणार आहेत. भारतातील लोकशाहीचा उत्सव जवळून पाहण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी हे परदेशी राजदूत उत्तर-पूर्व  दिल्लीतील पंतप्रधानांच्या सभेला उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीतील ही पहिलीच सभा असणार आहे. ज्यामध्ये युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया, बांगलादेश, भूतान, इंडोनेशिया, मॉरिशस, नेपाळ, सिंगापूर, श्रीलंका, थायलंड आणि सेशेल्स येथील राजदूत उपस्थित राहतील. "भाजपाला जाणून घ्या" कार्यक्रमांतर्गत, भाजपाच्या परराष्ट्र विभागाने या राजदूतांना जाहीर सभेला उपस्थित राहण्यासाठी आणि पक्षाची माहिती घेण्यासाठी आमंत्रित केले आहे. 

दिल्लीच्या सभेत परदेशी राजदूतांना आमंत्रण दिल्यानंतर, भाजपाने महिन्याच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ वाराणसीमध्ये राजदूतांच्या पार्टीचे आयोजन करण्याची योजना आखली आहे, जेथे १ जून रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजदूतांचे एक शिष्टमंडळ ओडिशालाही भेट देणार असून, काही राजदूत राजस्थान आणि गुजरातलाही गेले आहेत.

दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांवर २५ मे रोजी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी साडे सहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर-पूर्व दिल्लीत जाहीर सभेला संबोधित करतील. दरम्यान, उत्तर-पूर्व दिल्लीतून भाजपाने मनोज तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. तर मनोज तिवारी यांच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राहुल गांधी यांचीही होणार सभा
दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही आज दिल्लीत सभा होणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पार्टीसोबत एकजुटता असल्याचे दाखवण्यासाठी ३१ मार्च रोजी झालेल्या इंडिया आघाडीच्या संयुक्त रॅलीनंतर आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी रामलीला मैदानावर आयोजित सभेला संबोधित करतील. राहुल गांधी यांची दिल्लीतील ही पहिलीच सभा असणार आहे.

Web Title: pm narendra modi rally north east delhi diplomats from countries lok sabha elections 2024 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.