गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 10:08 AM2024-05-19T10:08:13+5:302024-05-19T10:09:05+5:30

गॅस टँकरमधून गॅसची चोरी होत असताना ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मोहितेवाडी येथे ओंकार हॉटेलच्या आवारात रिलायन्स गॅस टँकर व इतर वाहने मुक्कामासाठी पार्किंग केलेली होती.

Gas tanker explosion at Shelpimpalgaon Houses and vehicles on fire | गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

भानुदास पऱ्हाड

शेलपिंपळगाव : शेलपिंपळगाव (ता. खेड) हद्दीतील मोहितेवाडी येथे गॅसच्या टँकरचा स्फोट होऊन शेजारी पार्किंग केलेली तीन मालवाहू गाड्या जळून खाक झाल्या. तर स्फोटाच्या आवाजाने लगतच्या परिसरातील अनेक घरांना तडे गेले असून अतोनात नुकसान झाले आहे. सुदैवाने स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल होत आग आटोक्यात आणली.

दरम्यान, गॅस टँकरमधून गॅसची चोरी होत असताना ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मोहितेवाडी येथे ओंकार हॉटेलच्या आवारात रिलायन्स कंपनीचा गॅस टँकर व इतर वाहने मुक्कामासाठी पार्किंग केलेली होती. रविवारी (दि.१९) पहाटे चारच्या सुमारास चाळीस टनी टँकरने (जी. एन ०६ एक्स ५४१८) पेट घेतला आणि काही वेळातच त्याचा भयानक स्फोट झाला. 

स्फोटाने टँकरच्या टाकीचे अवशेष अक्षरशः काही अंतरावर फेकले गेले. तर आगीमुळे टँकर शेजारी पार्किंग केलेली तीन मोठी वाहने जळून खाक झाली आहेत. स्फोटाच्या आवाजाने हॉटेल व आजूबाजूची अनेक घरे उद्धवस्त झाली आहेत. सुमारे शंभर ते दीडशे मीटर अंतरातील अनेक घरांचे पत्रे, खिडक्यांच्या काचा फुटल्या असून भिंतींना तडे गेले आहेत. घरातील दैनंदिन वापराचे साहित्य अस्ताव्यस्त पसरले आहे. तर आजूबाजूची आंबे, नारळ व विविध फळझाडांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, घटनास्थळी उपायुक्त डॉ. शिवाजी पवार व पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेची पाहणी करून पंचनामा नोंदवला. संबंधित गॅस टँकरलगत घरगुती गॅसच्या आठ ते दहा टाक्या  आढळून आल्या आहेत. त्यामुळे टँकरमधील गॅस अवैधरित्या घरगुती गॅसच्या टाकीत भरताना हा प्रकार घडल्याची शक्यता उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी व्यक्त केली. 

गॅस टँकरला आग लागल्याची माहिती मिळताच आजूबाजूच्या सर्व स्थानिक नागरिकांनी घरातून दूर अंतरावर पळ काढला. दरम्यान, पहाटे साडेचारच्या आसपास गॅसच्या टाकीचे चार ते पाच भयानक स्फोट झाले. स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हा आवाज ऐकू आला. या घटनेने नागरिक प्रचंड घाबरले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक ग्रामपंचायतीने शेलपिंपळगाव परिसरातील आवारात गॅस टँकरच्या पार्किंगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे सरपंच शरद मोहिते यांनी सांगितले.

Web Title: Gas tanker explosion at Shelpimpalgaon Houses and vehicles on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे