भाजपच्या दिग्गजांना धक्का; परभणी जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 02:41 PM2021-03-23T14:41:15+5:302021-03-23T14:45:17+5:30

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांनी एका जागेवरुन बोर्डीकर गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाली.

Shock to BJP veterans; Mahavikas Aghadi dominates Parbhani District Bank | भाजपच्या दिग्गजांना धक्का; परभणी जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

भाजपच्या दिग्गजांना धक्का; परभणी जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा बँक वरपूडकर गटाने त्यांच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. २१ पैकी ११ जागा वरपूडकर गटाने पटकाविल्या आहेत. 

परभणी: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आ.सुरेश वरपूडकर यांच्या महाविकास आघाडी शेतकरी विकास पॅनलने वर्चस्व मिळविले असून या पॅनलचे ११ उमेदवार विजयी झाले आहेत. विरोधी बोर्डीकर पॅनलचे ९ उमेदवार विजयी झाले आहेत. 

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची मंगळवारी शहरातील कल्याण मंडपम्‌ येथे मतमोजणी झाली. यामध्ये आ.सुरेश वरपूडकर यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी शेतकरी विकास पॅनलचे परभणीतून आ.सुरेश वरपूडकर, सोनपेठमधून राजेश विटेकर, वसमतमधून आ.चंद्रकांत नवघरे, औंढ्यातून राजेश पाटील गोरेगावकर, कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया गटातून माजी आ. सुरेश देशमुख, महिला प्रतिनिधी गटातून प्रेरणा समशेर वरपूडकर, इतर मागास प्रवर्ग गटातून भगवान वाघमारे तर अनुसूचित जाती गटातून अतुल सरोदे विजयी झाले. मानवत गटातून पंडितराव चोखट तर पूर्णा गटातून बालाजी देसाई आणि सेनगावमधून साहेबराव पाटील गोरेगावकर हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे २१पैकी ११जागा वरपूडकर गटाने पटकाविल्या आहेत. 

भाजपाचे माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाला ९ जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये सेलूतून आ.मेघना बोर्डीकर, कळमनुरीतून माजी खा.शिवाजी माने, महिला प्रतिनिधी गटातून भावना रामप्रसाद बोर्डीकर, इतर शेती संस्था गटातून आनंदराव भरोसे हे विजयी झाले. तर विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघात वरपूडकर गटाचे ॲड. स्वराजसिंह परिहार आणि बोर्डीकर गटाचे दत्ता मायंदळे यांना समान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये मायंदळे यांच्या बाजुने कौल लागला. त्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. या गटाचे यापूर्वीच जिंतूरमधून माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, पाथरीतून आ.बाबाजानी दुर्राणी, हिंगोलीतून आ.तानाजी मुटकुळे, गंगाखेडमधून भगवानराव सानप बिनविरोध निवडले गेले आहेत. 

पालम गटातून भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेशराव रोकडे विजयी झाले आहेत; परंतु, ते कोणत्याही गटात नव्हते.  या अनुषंगाने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सद्यस्थितीत आपण कोणत्याही गटात गेलेलो नाही. आपण अपक्ष आहोत, योग्य वेळी निर्णय जाहीर करु, असे सांगितले. दरम्यान, जिल्हा बँक वरपूडकर गटाने त्यांच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. वरपूडकर यांनी महाविकास आघाडी या निवडणुकीत स्थापन केली होती; परंतु, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांनी एका जागेवरुन बोर्डीकर गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाली. निकालाअंती आ. दुर्राणी यांनी दिलेली साथ सद्य स्थितीत तरी बोर्डीकरांना सत्ता मिळवून देऊ शकली नाही. 

महाविकास आघाडीला मिळालेल्या जागा:११
तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनलला मिळालेल्या जागा:०९
अपक्ष:०१

Web Title: Shock to BJP veterans; Mahavikas Aghadi dominates Parbhani District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.