परभणी हादरले! पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते गौतम मुंडेंच्या घरावर गोळीबाराने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 18:01 IST2026-04-15T18:00:45+5:302026-04-15T18:01:49+5:30
सुदैवाने जीवितहानी टळली; पोलीस अधीक्षकांसह मोठा ताफा घटनास्थळी

परभणी हादरले! पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते गौतम मुंडेंच्या घरावर गोळीबाराने खळबळ
परभणी : शहरातील सुजाता कॉलनी परिसरात बुधवारी दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे मराठवाडा संघटक गौतम मुंडे यांच्या घरावर अज्ञात व्यक्तीकडून जुन्या वादातून तब्बल तीन राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी अचानक झालेल्या फायरिंगमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
थेट घरावर गोळ्या झाडल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान, फायर करणाऱ्या व्यक्तीस स्थानिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने शेजारील घरावर दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये अधिकच घबराट पसरली. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, स्थानिक गुन्हे शाखेचे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्यासह फॉरेनसिक तज्ञांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. प्राथमिक तपासात हा प्रकार जुन्या वैमनस्यातून घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर सुजाता कॉलनी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान पोलीस अधीक्षक परदेशी यांनी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली.