प्रशासकीय 'पाप'! दुधनेचे ८० दलघमी पाणी यंदाही वाया, १७ लाखांच्या निधीसाठी शेतकऱ्यांच्या भवितव्याशी खेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 14:41 IST2026-05-15T14:40:04+5:302026-05-15T14:41:35+5:30
मोजणी रखडल्याने यंदाही पूर्ण क्षमतेने पाणीसाठा अशक्य; 'लालफिती'च्या कारभाराचा सिंचनाला फटका.

प्रशासकीय 'पाप'! दुधनेचे ८० दलघमी पाणी यंदाही वाया, १७ लाखांच्या निधीसाठी शेतकऱ्यांच्या भवितव्याशी खेळ
- मोहन बोराडे
सेलू (जि. परभणी) : एकीकडे सरकार विविध किरकोळ कामांवर कोट्यवधी रुपयांची उधळण करत असताना, दुसरीकडे अवघ्या १७ लाख रुपयांच्या मोजणी निधीअभावी निम्न दुधना प्रकल्पाचा श्वास कोंडला जात आहे. जमिनीच्या संपादनाचा पेच सुटत नसल्याने यंदाही या प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसंचय करता येणार नाही. परिणामी, हक्काचे जवळपास ८० दलघमी पाणी दरवर्षी नदीपात्रात सोडून वाया घालवले जात आहे. प्रशासनाच्या या 'ढिसाळ' नियोजनाचा फटका सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी दुधनावर अवलंबून असलेल्या हजारो शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना बसत आहे.
निम्न दुधना प्रकल्पात १०० टक्के जलसाठा केल्यास बुडीत क्षेत्रातील २३ गावांमधील असंपादित जमिनीवर पाणी साचते. या जमिनींचा मोबदला मिळावा, यासाठी शेतकऱ्यांचा विरोध असल्याने गेल्या तीन वर्षांपासून प्रकल्पात केवळ ७५ टक्केच साठा केला जात आहे. विशेष म्हणजे, या जमिनींच्या मोजणीसाठी लागणारा निधी अवघा १७ लाख रुपये आहे. गोदावरी मराठवाडा विकास पाटबंधारे महामंडळाकडून हा तुटपुंजा निधी मिळत नसल्याने ७ गावांतील मोजणी रखडली आहे. एका बाजूला शासन जाहिराती आणि इतर कामांवर करोडो रुपये खर्च करत असताना, इतक्या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी १७ लाखांची 'बाधा' लागावी, याबद्दल संताप व्यक्त होत आहे.
पाणी असूनही शेतकरी तहानेलेलाच
प्रकल्पात पाणी साठवण्याची क्षमता ३४४.८०० दलघमी असतानाही केवळ संपादनाच्या दिरंगाईमुळे पूर्ण साठा करता येत नाही. यामुळे सेलू, मानवत, जिंतूर आणि परभणी तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना उन्हाळी आवर्तनासाठी पाण्यासाठी वणवण करावी लागते. जर १०० टक्के साठा झाला, तर रब्बीसह उन्हाळी पिकांनाही मुबलक पाणी मिळू शकते, मात्र प्रशासनाच्या 'लालफिती'च्या कारभारामुळे हे पाणी पुन्हा नदीत सोडून दिले जात आहे.
मोजणीचा 'फार्स' आणि रखडलेली गावे
बुडीत क्षेत्रातील २३ पैकी १६ गावांची मोजणी झाली असली तरी, एकरुखा, नांद्रा, फिरोजाबाद, मापेगाव खू, मापेगाव बु, हातवन आणि सातोना खू या ७ गावांमधील अंदाजे ८२.५६ हेक्टर क्षेत्राची मोजणी अद्याप कागदावरच आहे. मोजणी शुल्क भरण्यासाठी निधी नसल्याचे कारण पुढे करून अधिकारी जबाबदारी झटकत आहेत.
लवकरच मोजणी पूर्ण होईल
निधी अभावी मोजणीला विलंब झाला आहे. निधी उपलब्ध करून लवकरच मोजणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
एस. यु. शेख, शाखा अभियंता, निम्न दुधना प्रकल्प
प्रकल्पाचे वास्तव (आकडेवारी सांगतेय व्यथा):
एकूण साठवण क्षमता: ३४४.८०० दलघमी
मर्यादित जलसाठा (७५ टक्के): २८४.२५० दलघमी
दरवर्षी वाया जाणारे अंदाजे पाणी: ८० दलघमी
मोजणीसाठी लागणारा किरकोळ निधी: १७ लाख रुपये
प्रलंबित गावे: ०७