ऑस्ट्रियन पिस्तूल, नंबर प्लेट नसलेली बाईक अन् १० गोळ्या; असा रचला होता चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 13:02 IST2026-05-07T12:53:26+5:302026-05-07T13:02:52+5:30
बंगाल हादरलं! सुवेंदू अधिकारींच्या निकटवर्तीयाची थरारक हत्या; १० गोळ्या झाडून चंंद्रनाथ रथ यांना संपवलं

ऑस्ट्रियन पिस्तूल, नंबर प्लेट नसलेली बाईक अन् १० गोळ्या; असा रचला होता चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा कट
Chandranath Rath Murder Case: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय हिंसाचाराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. भाजपचे दिग्गज नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची बुधवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम भागात हा थरार घडला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून राजकीय वातावरण तापले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रनाथ रथ हे बुधवारी रात्री आपल्या स्कॉर्पिओ गाडीने जात असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. एका सिल्व्हर रंगाच्या सँट्रो कारने रथ यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि त्यांना ओव्हरटेक करून गाडीचा वेग कमी करण्यास भाग पाडले. गाडीचा वेग कमी होताच मागून बाईकववर आलेल्या हल्लेखोरांनी रथ यांच्यावर जवळून अंदाधुंद गोळीबार केला.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले?
१० हून अधिक राऊंड फायर
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी तब्बल १० ते १२ गोळ्या झाडल्या. चंद्रनाथ यांच्या छातीवर, पोटावर आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रथ यांना तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या गोळीबारात रथ यांचा चालकही गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर कोलकाता इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नियोजित कट आणि ऑस्ट्रियन बनावटीचे पिस्तूल?
हा हल्ला अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. हल्लेखोरांनी त्या परिसराची आधीच रेकी केली होती आणि पळून जाण्यासाठी सुरक्षित मार्ग निवडला होता. हल्ल्यासाठी वापरलेल्या बाईकला नंबर प्लेट नव्हती. घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांवरून पोलिसांनी अंदाज व्यक्त केला की, या हत्येसाठी ऑस्ट्रियन बनावटीच्या ग्लोक पिस्तूलचा वापर केला असावा. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून काडतुसे जप्त केली आहेत.
राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
या हत्येनंतर बंगालच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध पेटले आहे. "ही हत्या पूर्वनियोजित कट असून हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, पोलिसांच्या कारवाईवर आमचे लक्ष आहे," अशी प्रतिक्रिया सुवेंदू अधिकारी यांनी दिली. भाजप नेते अर्जुन सिंह यांनी थेट तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. "हा खून अभिषेक बॅनर्जी यांनीच घडवून आणला आहे, त्यांना दहशत निर्माण करायची आहे," असा दावा सिंह यांनी केला. तृणमूल काँग्रेसने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. लोकशाहीत हिंसेला स्थान नाही, असे म्हणत त्यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, राज्याचे पोलीस महासंचालक सिद्धार्थ नाथ गुप्ता यांनी सांगितले की, हत्येशी संबंधित एक वाहन जप्त करण्यात आले असून त्याची नंबर प्लेट बदलण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने मुख्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. सध्या तीन स्थानिक गुंडांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे.