झारखंडमध्ये भीषण अपघात; ८० प्रवाशांनी भरलेली बस ओरसा व्हॅलीत उलटली, ५ ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 17:22 IST2026-01-18T17:19:52+5:302026-01-18T17:22:15+5:30
घटनेची माहिती मिळताच महुआडांड पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोज कुमार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रशासनाकडून घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

झारखंडमध्ये भीषण अपघात; ८० प्रवाशांनी भरलेली बस ओरसा व्हॅलीत उलटली, ५ ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील महुआडांड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ओरसा व्हॅलीत बस उलटून भीषण अपघात झाला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, मोठी जीवितहानी झाल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच महुआडांड पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोज कुमार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रशासनाकडून घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. मदतकार्यासाठी घटनास्थळी तात्काळ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या असून, जखमींना रुग्णालयात हलवण्यात येत आहे.
सरकारी रुग्णालय जखमींनी भरले -
महुआडांडचे सरकारी रुग्णालय जखमींनी भरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील लोक छत्तीसगडमधील बलरामपूर येथून लोध फॉल या पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी निघाले होते. मात्र, व्हॅलीत अचानक बस उलटल्याने एकच आरडा-ओरड सुरू झाली. हा अपघात एवढा भीषण होता की प्रवाशांना सावरण्याची संधीच मिळाली नाही.
५ महिलांचा जागीच मृत्यू -
मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये ८० लोक बसलेले होते. आतापर्यंत पाच महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, बसखाली आणखी मृतदेह असण्याची शक्यता आहे. तर काही जखमी प्रवासीही बसखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातग्रस्त बस ही बलरामपूर येथील ज्ञान गंगा हायस्कूलची स्कूल बस असल्याचे समजते.