BJP Trails in Tamil Nadu Kerala: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकालावरुन भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का दिल्याचे स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे, तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय याच्या तमिझागा वेत्री कझगम पक्षाने राजकीय भूकंप घडवून आणला असून, प्रस्थापित डीएमके आणि एआयएडीएमकेला धोबीपछाड दिली आहे. मात्र भाजपला या दोनच राज्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही.
पश्चिम बंगालमध्ये कमळ उमलले
पश्चिम बंगालमध्ये गेल्या १५ वर्षांपासून असलेल्या ममता बॅनर्जींच्या सत्तेला भाजपने सुरुंग लावला आहे. २९४ जागांच्या या विधानसभेत भाजपने बहुमताचा १४७ हा आकडा सहज पार केला असून सध्या भाजप १९८ हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. दक्षिण बंगाल, जो तृणमूलचा बालेकिल्ला मानला जात असे, तिथेही भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. तर भवानीपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आघाडीवर आहेत.
तामिळनाडूत थलापती विजयचा व्हिक्ट्री शो
तामिळनाडूच्या राजकारणात यावेळी सर्वात मोठा चमत्कार पाहायला मिळाला आहे. सुपरस्टार विजय याच्या पक्षाने पहिल्याच निवडणुकीत ११० हून अधिक जागांवर आघाडी घेत सर्वांना चकित केले आहे. तामिळनाडूच्या जनतेने द्रविड राजकारणाच्या दोन पारंपरिक पक्षांना बाजूला सारून एका नव्या चेहऱ्याला पसंती दिली आहे. मात्र एआयएडीएमकेसोबत युती करूनही भाजपला राज्यात केवळ १ ते ३ जागांवर समाधान मानावे लागत आहे.
आसामध्ये भाजपची हॅट्ट्रिक निश्चित
ईशान्येकडील महत्त्वाच्या आसाम राज्यात भाजपने आपली सत्ता कायम राखली आहे. १२६ पैकी ९९ जागांवर भाजपप्रणित एनडीए आघाडीवर असून, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची रणनीती यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. काँग्रेसप्रणित आघाडी केवळ २५ जागांवर अडकली आहे.
केरळमध्ये डाव्यांना धक्का, काँग्रेसचे पुनरागमन
केरळमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा मतदारांनी कायम ठेवली आहे. सत्ताधारी एलडीएफला नाकारून मतदारांनी काँग्रेसप्रणित यूडीएफला कौल दिला आहे. यूडीएफ ९५ हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. महत्त्वाचे म्हणजे, केरळमध्येही भाजपला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. भाजप केवळ दोन जागांवर आघाडीवर आहे.
दरम्यान या निवडणुकीने हे स्पष्ट केले आहे की, उत्तर आणि पूर्व भारतात मोदी लाट अजूनही कायम आहे. मात्र, दक्षिण भारतात आजही भाषिक अस्मिता आणि स्थानिक मुद्दे प्रभावी ठरत आहेत.
Web Summary : BJP triumphs in Assam and West Bengal but faces setbacks in Tamil Nadu and Kerala. Tamil Nadu witnesses a new political force emerge. Southern states prioritize regional issues.
Web Summary : भाजपा असम और पश्चिम बंगाल में विजयी, लेकिन तमिलनाडु और केरल में झटका। तमिलनाडु में एक नई राजनीतिक शक्ति का उदय। दक्षिणी राज्य क्षेत्रीय मुद्दों को प्राथमिकता देते हैं।