Nashik TCS Conversion Case: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या नाशिक येथील युनिटमध्ये समोर आलेल्या धर्मांतर आणि लैंगिक छळाच्या गंभीर आरोपांनी संपूर्ण देश हादरला आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अखेर १० दिवसांनंतर टीसीएस कपंनीचा या प्रकरणात मोठा आणि अधिकृत खुलासा समोर आला आहे. या प्रकरणी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, कंपनीने आता या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एका उच्चस्तरीय ओव्हरसाईट कमिटीची घोषणा केली आहे.
TCS ची अधिकृत भूमिका आणि स्पष्टीकरण
या वादावर मौन सोडत टीसीएसने शुक्रवारी एक सविस्तर पत्रक प्रसिद्ध केले आहे. कंपनीच्या प्राथमिक तपासणीनुसार, अंतर्गत एथिक्स किंवा पॉश चॅनेलवर या प्रकारची कोणतीही तक्रार मिळाली नव्हती. तसेच तपास पूर्ण होईपर्यंत या प्रकरणाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. कंपनीने स्पष्ट केले की, निदा खान ही कोणतीही एचआर मॅनेजर किंवा भरती प्रक्रियेतील अधिकारी नव्हती. ती केवळ एक प्रोसेस असोसिएट म्हणून काम करत होती.
काय आहे नेमकं प्रकरण?
हे संपूर्ण प्रकरण २०२२ मध्ये सुरू झाले, जेव्हा एका महिला कर्मचाऱ्याने तिचा सहकारी दानिश शेख याच्यावर गंभीर आरोप केले. दानिशने आपले लग्न झालेले असतानाही ते लपवून ठेवले आणि लग्नाचे आमिष दाखवून पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले. या प्रकरणात दानिशची बहीण निदा खान आणि तौसिफ अख्तर यांनीही महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. त्यांनी दानिशचे पहिले लग्न झाल्याची माहिती पीडितेपासून लपवून ठेवली. इतकेच नव्हे तर, निदा खानने पीडितेच्या धर्माबद्दल अपमानास्पद टिप्पणी करत तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचाही उल्लेख पोलीस तक्रारीत आहे.
या घटनेनंतर आणखी सात महिलांनी पुढे येत वरिष्ठ सहकाऱ्यांकडून मानसिक आणि लैंगिक छळ होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. हे सर्व प्रकार फेब्रुवारी २०२२ ते मार्च २०२६ या कालावधीत घडल्याचे समोर आले आहे.
तपास आणि अटकेची कारवाई
नाशिकपोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी सात कर्मचाऱ्यांना अटक केली आहे, ज्यामध्ये सहा पुरुष आणि एका महिला एचआर प्रमुखाचा समावेश आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान अद्याप फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. नाशिक गुन्हे शाखेचे पथक ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथेही पोहोचले होते. निदा सध्या गर्भवती असून तिने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
चौकशीसाठी दिग्गजांची समिती
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून टीसीएसचे सीईओ के. कृतीवासन यांनी जाहीर केले की, वित्त क्षेत्रातील दिग्गज केकी मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली एक देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय, डेलॉईट आणि ट्रायलीगल यांसारख्या बाह्य संस्थांची स्वतंत्र सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संपूर्ण अंतर्गत चौकशीचे नेतृत्व कंपनीच्या प्रेसिडेंट आणि सीओओ आरती सुब्रमण्यम करत आहेत.
अत्यंत वेदनादायी घटना- एन. चंद्रशेखरन
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. "महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत आम्ही अत्यंत संवेदनशील आहोत. या आरोपांमुळे आम्हाला खूप वेदना झाल्या असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल," असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, नाशिकमधील कामकाज बंद पडल्याच्या अफवा कंपनीने फेटाळून लावल्या असून युनिटचे काम सुरळीत सुरू असल्याचे सांगितले आहे.
Web Summary : TCS addresses Nashik unit allegations of harassment and forced conversion. Internal probe found no prior complaints. Key figures suspended. Unit operations continue normally. Senior committee formed for review.
Web Summary : टीसीएस ने नासिक इकाई में उत्पीड़न और धर्मांतरण के आरोपों को संबोधित किया। आंतरिक जांच में पहले कोई शिकायत नहीं मिली। प्रमुख कर्मचारी निलंबित। यूनिट का संचालन सामान्य रूप से जारी। समीक्षा के लिए वरिष्ठ समिति गठित।