Gujarat Titans vs Kolkata Knight Riders, 25th Match : कगिसो रबाडा आणि मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यानंतर कर्णधार शुभमन गिलच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सच्या संघाने घरच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्सला ५ विकेट्स आणि २ चेंडू राखून पराभूत केले. यंदाच्या हंगामातील तिसऱ्या विजयासह ६ गुण आपल्या खात्यात जमा करत गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहचला आहे. दुसरीकडे ६ सामन्यात २५.२० कोटींच्या ऑलराउंडरच्या दमदार खेळीनंतरही अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सचा संघाला पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला. यंदाच्या हंगामातील एका अनिर्णित सामन्यातील एका गुणासह ते तळाला आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्यांदा बॅटिंग, KKR नं ३२ धावांवर गमावल्या ३ विकेट्स
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात मोहम्मद सिराजनं कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेला 'गोल्डन डक'सह तंबूचा रस्ता दाखवला. तिसऱ्या षटकात अंगकृष रघुवंशी ४ चेंडूत ८ धावांवर तर टिम सिफर्ट १४ चेंडूत १९ धावांवर कगिसो रबाडाच्या जाळ्यात अडकले. पॉवरप्लेमध्ये चौथ्या षटकात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने ३२ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या.
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
अखेर २५.२० कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली
संघ अडचणीत असताना KKR च्या ताफ्यातील सर्वात महागडा खेळाडू (२५.२० कोटी) कॅमरून ग्रीन आणि रोव्हमन पॉवेल जोडी जमाली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४२ चेंडूत ५५ धावांची भागीदारी रचत कोलकाता नाईट रायडर्सचा डाव सावरला. रोव्हमन पॉवेल २० चेंडूत २७ धावा करून परतल्यावर ग्रीन-अनुकूल रॉय यांनी पाचव्या विकेटसाी २३ चेंडूत ६० धावांची भागीदारी रचत ही लढाई २०० पार करण्याचे संकेत दिले. पण त्यानंतर एकाही बॅटरला मोठे फटकेबाजी करताना आली नाही. कॅमरून ग्रीनने ५५ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने केलेल्या ७९ धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने निर्धारित २० षटकात सर्वबाद १८० धावांपर्यंतच मजल मारली.
अखेरच्या षटकात ३२ धावांत ५ विकेट्स
कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने १५ षटकांच्या खेळानंतर ५ बाद १४८ धावा केल्या होत्या. पण अखेरच्या पाच षटकात कगिसो रबाडा, अशोक शर्मा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि राशीद खान यांनी उत्तम गोलंदाजी करत ५ विकेट्स घेत फक्त ३२ धावा खर्च केल्या. ही कामगिरी गुजरातच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरली. गुजरातकडून रबाडाने सर्वाधिक ३ तर मोहम्मद सिराज आणि अशोक शर्मानं प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. राशीद खान आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
शुभमन गिलची सामना सेट करणारी खेळी
कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना साई सुदर्शन १६ चेंडूत २२ धावा करून परतला. जोस बटलची खेळी १५ चेंडूत २५ धावांच्या खेळीवरच थांबली असताना कर्णधार शुभमन गिलनं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने ५० चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८६ धावा करत सामना गुजरातच्या बाजूनं सेट केला. त्याच्याशिवाय वॉशिंग्टन सुंदरनं १३ चेंडूत १३ धावा तर ग्लेन फिलिप्सनं १६ चेंडूत १९ धावा करून मैदान सोडल्यावर राहुल तेवतिया ७ (६) आणि शाहरुख खान ३ (२) यांनी गुजरातचा विजय निश्चित केला. कोलकाताच्या संघाकडून वरुण चक्रवर्तीनं सर्वाधिक २ तर रमनपदीप सिंग, सुनील नरेन आणि वैभव अरोरा यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
Web Summary : Gujarat Titans defeated Kolkata Knight Riders by 5 wickets, propelled by Shubman Gill's brilliant half-century. Green's valiant effort went in vain as Gujarat secured a crucial victory.
Web Summary : शुभमन गिल के शानदार अर्धशतक से गुजरात टाइटन्स ने कोलकाता नाइट राइडर्स को 5 विकेट से हराया। ग्रीन का वीरतापूर्ण प्रयास व्यर्थ गया क्योंकि गुजरात ने महत्वपूर्ण जीत हासिल की।