चेन्नई - तमिळनाडूच्या चेन्नईतील चेपॉक-तिरुवल्लिकेनी विधानसभा मतदारसंघातही बहुपक्षीय लढत होण्याची शक्यता आहे, परंतु ही निवडणूक लढाई प्रामुख्याने द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) युवा शाखेचे प्रमुख उदयनिधी स्टॅलिन आणि अद्रमुकचे ज्येष्ठ नेते अधी राजाराम यांच्यातच असल्याचे दिसते.
तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन या जागेवरून पुन्हा निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातून त्यांचे आजोबा आणि माजी मुख्यमंत्री, दिवंगत एम. करुणानिधी हे १९९६, २००१ आणि २००६ मध्ये सलग तीन वेळा विधानसभेत निवडून गेले होते. उदयनिधी यांनी २०२१ ची निवडणूक जिंकण्यापूर्वी, द्रमुकचे जे. अनबलगन यांनी २०११ आणि २०१६ मध्ये ही जागा जिंकली होती. हा मतदारसंघ द्रमुकचा बालेकिल्ला आहे.
अधी राजाराम हे द्रमुकची ही पकड ढिली करण्याच्या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पक्षातील नेतृत्वाच्या संकटाच्या काळात त्यांनी टीटीव्ही दिनकरन किंवा ओ. पनीरसेल्वम यांना पाठिंबा दिला नव्हता. ते म्हणतात की, मी येथील द्रमुकचे वर्चस्व संपवणार आहे. मोठ्या फरकाने जिंकेन आणि घराणेशाही संपवेन. गेल्या पाच वर्षांत येथे कोणताही विकास झालेला नाही. त्यांनी यापूर्वी २००६ मध्ये थाउजंड लाइट्स मतदारसंघातून एम. के. स्टॅलिन यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि ते दुसऱ्या क्रमांकावर आले होते. दरम्यान, ४८ वर्षीय उदयनिधी ‘द्रविड मॉडेल २.०’ सरकारच्या नावाखाली प्रचार करत आहेत.
अनेक समस्याहा भाग स्थानिक समस्यांशीही झुंजत आहे. कालबाह्य नागरी पायाभूत सुविधा, सततची वाहतूककोंडी, पावसाळ्यातील पाणी साचणे आणि अपुऱ्या नागरी सोयीसुविधा या येथील प्रमुख समस्या आहेत. २०२६ च्या आकडेवारीनुसार या मतदारसंघात एकूण १,६३,८६६ मतदार आहेत.
उदयनिधी यांचा आणखी विकासाचा दावाचेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघ हा चेन्नई सेंट्रल लोकसभा मतदारसंघाच्या सहा विभागांपैकी एक असून, त्यात मरीना बीच आणि एम. ए. चिदंबरम स्टेडियम यांसारख्या प्रमुख स्थळांचा समावेश आहे. उदयनिधी यांनी २०२१ मध्ये आपल्या पहिल्या निवडणुकीत पीएमकेचे ए. व्ही. ए. कसाली यांचा ६९,३५५ मतांनी पराभव केला.
एक फोटो निवडणूक बदलू शकेल? उदयनिधींच्या प्रचारातील एक प्रमुख मुद्दा म्हणजे २०१७ मधील तो फोटो, ज्यामध्ये अद्रमुकचे सरचिटणीस ई. के. पलानीस्वामी हे दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निकटवर्ती व्ही. के. शशिकला यांच्या पाया पडताना दिसत आहेत. पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रीपदी बढती देण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी उदयनिधी याच फोटोचा वापर करत आहेत.मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान, उदयनिधींनी मदुराई येथील अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रकल्पाच्या बांधकामास होणाऱ्या विलंबाबद्दल केंद्र सरकारवर टीका करत, ‘एम्स’ लिहिलेली एक वीट प्रदर्शित केली होती. पलानीस्वामींनी प्रत्युत्तर दिले होते की, उदयनिधींच्या टीकेमध्ये शिस्तीचा अभाव आहे.
Web Summary : Chepauk-Tiruvallikeni witnesses a key battle between DMK's Udhayanidhi Stalin and ADMK's Adhi Rajaram. Stalin aims for re-election, continuing his family's legacy in this DMK stronghold. Rajaram vows to end DMK dominance, highlighting local issues like infrastructure and traffic. Udhayanidhi focuses on development and criticizes ADMK leadership.
Web Summary : चेपॉक-तिरुवल्लिकेनी में द्रमुक के उदयनिधि स्टालिन और अन्नाद्रमुक के अधि राजाराम के बीच मुकाबला है। स्टालिन का लक्ष्य पुन: चुनाव है, जबकि राजाराम द्रमुक के वर्चस्व को खत्म करने का संकल्प लेते हैं। स्थानीय मुद्दों और बुनियादी ढांचे पर ध्यान केंद्रित किया जा रहा है। उदयनिधि विकास पर जोर देते हैं।