भाजपने ८७ नेत्यांची कुमक पाठवूनही केरळ हातून गेले
By कमलेश वानखेडे | Updated: May 5, 2026 15:35 IST2026-05-05T15:32:55+5:302026-05-05T15:35:05+5:30
Nagpur : केरळ जिंकण्यासाठी भाजपने 'इलेक्शन मॅनेजमेंट'चा अनुभव असलेल्या राज्य व विदर्भातील ८७नेत्यांवर जबाबदारी सोपविली होती. हे नेते प्रचारात केरळमध्ये ठाणू मांडून होते.

BJP lost Kerala despite sending help from 87 leaders
कमलेश वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केरळ जिंकण्यासाठी भाजपने 'इलेक्शन मॅनेजमेंट'चा अनुभव असलेल्या राज्य व विदर्भातील ८७नेत्यांवर जबाबदारी सोपविली होती. हे नेते प्रचारात केरळमध्ये ठाणू मांडून होते. मात्र, त्यानंतरही केरळमध्ये भाजपला यश आले नाही. केरळमध्ये फेल ठरलेले हे नेते बंगालचा विजय साजरा करीत कार्यकर्त्यांचे तोंड गोड करत धन्यता मानताना दिसले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केरळ जिंकण्यासाठी महाराष्ट्रातून कुमक पाठविली होती. राज्यभरातील अभ्यासू, बऱ्यापैकी इंग्रजी बोलता येत असणाऱ्या नेत्यांची केरळच्या प्रचारासाठी नियुक्ती करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आ. डॉ. परिणय फुके, आ. प्रवीण दटके, माजी आ. अनिल सोले, गिरीश व्यास, आ. सुमित वानखेडे, आ. मिलिंद नरोटे, करण देवतळे, श्वेता महल्ले, रणजित पाटील, प्रताप अडसड यांच्यासह विदर्भातील तब्बल ८७नेत्यांचा यात समावेश होता.
निवडणुका कशा जिंकायच्या याचा अनुभव असलेल्या नेत्यांना यात प्राधान्य देण्यात आले होते. केरळच्या प्रचारात नेमके कोणते मुद्दे उचलायचे, महाराष्ट्रातील विकासाचा आलेख केरळमध्ये कसा मांडायचा आदी बाबींवर फोकस करण्याच्या सूचना संबंधितांना पक्षाकडून देण्यात आल्या होत्या. संबंधित नेत्यांनी चोखपणे ती जबाबदारी पार पाडली. मात्र, निकालात या प्रचाराचा फायदा झाल्याचे दिसले नाही. केरळमध्ये फेल ठरलेले भाजप नेते बंगालच्या निकालाचा गुलाल उधळत कार्यकर्त्यांना मिठाई भरवताना मात्र आघाडीवर होते.
केरळच्या यशात राऊत, केदार, ठाकरे यांचे योगदान
केरळच्या प्रचारात काँग्रेसकडून माजी मंत्री नितीन राऊत, सुनील केदार, आ. विकास ठाकरे, काँग्रेसचे अ. भा. सचिव प्रफुल्ल गुडधे आर्दीवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. या नेत्यांनी केरळमध्ये मुक्काम करीत प्रचाराची धुरा सांभाळली. महाराष्ट्र प्रभारी असलेले केरळचे नेते रमेश चेन्नीथला यांना प्रचारात साथ दिली. निरीक्षकाची भूमिका बजावत नाराज पदाधिकाऱ्यांना मनविण्यापासून ते मतदारसंघाचे नियोजन करण्यापर्यंतची जबाबदारी पार पाडली. केरळमध्ये काँग्रेसला यश मिळाल्याने या नेत्यांच्या परिश्रमाला पावती मिळाली आहे.
"पश्चिम बंगाल, आसाममध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. विकासाच्या राजकारणाचा हा पुरावा आहे. केरळमध्येही भाजपचे खाते उघडले गेले. ही एक सकारात्मक व ऐतिहासिक सुरुवात आहे. येत्या काळात केरळमध्येही भाजपची सत्ता येईल, यात दुमत नाही."
- आ. डॉ. परिणय फुके, भाजप