दुर्दैवी योगायोग...! "...तर दादा आज आपल्यात असते!"; अजित दादांनी शेवटची सही कोणत्या फाईलवर केली? आमदार सरोज आहिरे यांनी सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 13:59 IST2026-01-31T13:57:56+5:302026-01-31T13:59:12+5:30
Saroj Ahir On Ajit Pawar Nashik : "आपल्या सर्वांना सांगते, महाराष्ट्राची धान खरेदीची फाईल, ज्याच्यासाठी दादा थांबले. नाहीतर ते गाडीने निघून जाणार होते. जर ते थांबले नसते तर, ते आज आपल्यात असते."

दुर्दैवी योगायोग...! "...तर दादा आज आपल्यात असते!"; अजित दादांनी शेवटची सही कोणत्या फाईलवर केली? आमदार सरोज आहिरे यांनी सांगितलं
राज्याचे उपमुख्यमत्री अजित पवार यांचे बुधवारी (२८ जानेवारी २०२६) विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अद्यापही सावरू शकलेला नाही. दरम्यान, "अजित दादा यांनी शेवटची सही माझ्या मतदारसंघातील 'सिद्ध पिंप्री' गावच्या स्मशानभूमीच्या फाईलवर केली. या स्मशानभूमीला एक कोटी रुपये देऊन गेले दादा. शेवटचं काम माझ्यासाठी केलं," असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) नाशिक जिल्ह्यातील देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांच्या डोळ्यातील अश्रूही थांबत नव्हते. त्या सिद्ध पिंप्री येथील शोकसभेत बोलत होत्या.
"...तर, दादा आज आपल्यात असते" -
आहिरे म्हणाल्या, "आपल्या सर्वांना सांगते, महाराष्ट्राची धान खरेदीची फाईल, ज्याच्यासाठी दादा थांबले. नाहीतर ते गाडीने निघून जाणार होते. जर ते थांबले नसते तर, ते आज आपल्यात असते. त्यानंतर, ढिकले साहेबांनी एक फाईल पुढे केली. शेवटची सही माझ्या मतदारसंघातील 'सिद्ध पिंप्री' गावाच्या स्मशानभूमीच्या फाईलवर केली. या स्मशानभूमीला एक कोटी रुपये देऊन गेले दादा. शेवटचं काम माझ्यासाठी केलं. मी त्यांना कसे विसरणार आणि कसे अश्रू थांबणार."
"आज पवार कुटुंबाला आपल्या सर्व आमदारांची गरज आहे आणि आपल्या सर्वांची परवानगी घेऊन मुंबईला जात आहे. तेथे काय घडामोडी घडतायत काही समजत नाहीये, पण पक्षाचा आदेश आहे. आम्ही पवार कुटुंबासोबत कायम राहू आणि तुम्हीही त्यांच्यासोबत राहाल अशी अपेक्षा आहे," असेही अहेर म्हणाल्या.
"...जेणेकरून दादांची उणीव कमी भासेल" -
आहेर पुढे म्हणाल्या, "अजित दादांच्या उत्तराधिकारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी पवार यांचा आज शपथविधी आहे, असे आम्ही बातम्यांमधून ऐकत आहोत. आम्ही कालच मागणी केली होती की, दादांचा उत्तराधिकारी म्हणून वहिनींना राज्य शासनाच्या कारभारात सामावून घ्यावं, जेणेकरून दादांची उणीव कमी भासेल."
"मी कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार नाही, हा शब्द दादांना देते" -
"ग्रामीण भागाची जाण असलेलं नेतृत्व, विकास कामाशिवाय दुसरं काही समजत नव्हतं, त्यांनी कधी घाणेरडं राजकारण केलं नाही, कधी जातपात मानली नाही. माझ्यासारख्या मागासवर्गीय मुलीला नेहमीच हात धरून पुढे नेण्याचं काम केलं. दादा, तुमची ही छोटी बहीण, आपल्यात रक्ताचं नातं नव्हतं, पण तुम्ही जो आशीर्वाद दिला, जे प्रेम दिलं, आणि जाता जाता शेवटची सही माझ्या मतदारसंघाच्या फाईलवर केली, हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. मी कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार नाही, हा शब्द मी आज माझ्या दादांना देते, असेही आहेर यावेळी म्हणाल्या.