राष्ट्रवादीचा वाद आपसात मिटला तरी कोर्टाची लढाई सुरूच राहणार? अॅड. असीम सरोदे यांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 09:56 IST2026-01-21T09:55:16+5:302026-01-21T09:56:19+5:30
Sharad pawar vs Ajit Pawar NCP Case news: कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादावर आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायालयीन प्रक्रियेवर अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले आहे. शरद पवार आणि अजित पवार गटातील वाढत्या जवळीकीच्या पार्श्वभूमीवर सरोदे यांनी कायदेशीर तांत्रिक बाजू स्पष्ट केली आहे.

राष्ट्रवादीचा वाद आपसात मिटला तरी कोर्टाची लढाई सुरूच राहणार? अॅड. असीम सरोदे यांचे मोठे विधान
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दुसरीकडे दोन्ही वेगळे झालेले पक्ष महापालिका निवडणुकीपासून एकत्र येत आहेत. आता सुरु असलेली जिल्हा परिषद निवडणुकीतही अजित पवार राष्ट्रवादी आणि शरद पवार राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. अशातच दिल्लीत सुरु असलेला लढा सुटतो की पुढे लढला जातो, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. यावर हे प्रकरण मांडणारे कायदेतज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी स्पष्टता आणली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट (शरद पवार आणि अजित पवार) सध्या एकत्र येण्याचे किंवा आपसातील मतभेद मिटवण्याचे संकेत देत असले, तरी जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा विषय संपणार नाही, असे मत अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.
दोन्ही गटांच्या नेत्यांच्या अलीकडच्या वागणुकीवरून आणि भेटीगाठींवरून ते वाद आपसात सोडवण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. मात्र, राजकारण आणि कायदा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जोपर्यंत शरद पवार स्वतःहून सर्वोच्च न्यायालयातील याचिका अधिकृतपणे मागे घेत नाहीत, तोपर्यंत "राष्ट्रवादी पक्ष पळविण्याबाबतचे" प्रकरण न्यायालयाच्या बोर्डवर येतच राहील, असे असीम सरोदे यांनी स्पष्ट केले आहे.
शरद पवारांना माघार घ्यावी लागणार...
जोपर्यंत तक्रारदार आपली बाजू मागे घेत नाही, तोपर्यंत न्यायालय त्या प्रकरणावर सुनावणी घेणे सुरूच ठेवते. त्यामुळे पडद्यामागे कितीही तडजोडी झाल्या, तरी तांत्रिकदृष्ट्या ही लढाई सर्वोच्च न्यायालयात कायम आहे. यामुळे शरद पवारांनाच माघार घ्यावी लागणार आहे.