“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 20:36 IST2026-05-16T20:35:46+5:302026-05-16T20:36:09+5:30
Pawan Kalyan And Thalapathy Vijay: विजय आणि पवन कल्याण यांची तुलना केली जात असून, सोशल मीडियावर दोन सुपरस्टारवरून चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे.

“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
Pawan Kalyan And Thalapathy Vijay: दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यामध्ये दोन सुपरस्टार यांनी यशस्वी राजकीय वाटचाल करत मोठ्या पदांवर विराजमान झाले. एक म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि दुसरे म्हणजे तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय. पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशमध्ये राजकारणात प्रवेश करून मोठे यश मिळवले आणि उपमुख्यमंत्री झाले. यानंतर तामिळनाडूत विजय यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत सर्वाधिक जागा निवडून आणत मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. यानंतर आता या दोन्ही सुपरस्टारच्या चाहत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून चर्चा सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. यावर पवन कल्याण यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
थलपती विजय यांच्या तमिळनाडू वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाने, तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. इतकेच नव्हे तर, या नवीन पक्षाने स्थापनेनंतर केवळ अडीच वर्षांतच सत्ता मिळवली आहे. तामिळनाडूच्या शेजारील राज्य आंध्र प्रदेशात सुपरस्टार पवन कल्याण यांनी एक राजकीय पक्ष स्थापन करून सक्रियपणे नेतृत्व केले. पवन कल्याण सध्या आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत. परिणामी, आता विजय आणि पवन कल्याण यांची तुलना केली जात आहे. जनसेना पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी मुख्यमंत्री झालेल्या थलपती विजय यांच्याशी तुलना होणाऱ्या सोशल मीडियावरील कमेंट्सना प्रत्युत्तर दिले आहे.
जनसेना हा डाव्या किंवा उजव्या विचारसरणीचा पक्ष नाही
तामिळनाडूमधील राजकीय परिस्थिती आणि वातावरण आंध्र प्रदेशपेक्षा खूप वेगळे आहे. जेव्हा इतर सर्वांनी साथ सोडली, तेव्हा एकट्याने पक्षाला पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारली. जनसेना हा डाव्या किंवा उजव्या विचारसरणीचा पक्ष नाही. उलट विविध राजकीय पक्षांमधील सकारात्मक घटक आणि विचारधारा एकत्र करून या पक्षाची स्थापना केली, असे पवन कल्याण यांनी स्पष्ट केले. मंगलागिरी येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये जनसेना पक्षाने आयोजित केलेल्या एका छोट्या सभेत पवन कल्याण यांनी हे विचार व्यक्त केले. पक्ष बळकट करणे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मित्रपक्षांसोबत समन्वय यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा केली.
थलपती विजयशी तुलना करू नका
विजय याच्याशी तुलना करू नका. २००८ पासून राजकीय पक्ष कसा चालवायचा याचे बारकाईने नियोजन करत होते. जनसेनेबाबतची संकल्पना अनेक वर्षांपासून मनात रुजलेली होती. केवळ मुख्यमंत्री होण्याच्या किंवा राजकीय पदासोबत मिळणाऱ्या विशेषाधिकारांचा उपभोग घेण्याच्या एकमेव उद्देशाने पक्षाची स्थापना केली नाही. ज्या इतर राज्यांमध्ये जनसेनाने प्रचार केला, तिथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार विजयी झाले, असे पवन कल्याण यांनी नमूद केले.
पवन कल्याण यांना नेमका कोणता आजार झालाय?
राजकीय दौऱ्यांदरम्यान धुळीमुळे आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत. जेव्हा प्रवास करतो, तेव्हा त्यांचे चाहते प्रेमाने दोन्ही बाजूंनी त्यांचे हात धरतात. यामुळे त्यांच्या खांद्यांमधील अंतर वाढले असून, त्यांना थोडा त्रास होत आहे. पाठीच्या कण्याच्या समस्या आणि इतर आजार असूनही, पूर्णपणे निरोगी आहे, अशी माहिती पवन कल्याण यांनी दिली. पवन कल्याण याचे श्रेय पक्षाचे कार्यकर्ते आणि चाहत्यांच्या आशीर्वादाला देतात.
दरम्यान, लोक मोठ्या संख्येने जनसेनामध्ये सामील होत आहेत. पक्षाच्या सभांना उपस्थित राहत आहेत, ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा आणि उत्तर प्रदेश यांसारख्या इतर राज्यांमधूनही लोक पक्षात सामील होत आहेत, असे पवन कल्याण यांनी सांगितले.