मविआला एकच जागा, ८ महायुतीच्या पारड्यात! विधान परिषद निवडणूक : भाजपला ५ जागा, काँग्रेसला भोपळा?
By यदू जोशी | Updated: March 20, 2026 07:23 IST2026-03-20T07:22:53+5:302026-03-20T07:23:57+5:30
उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्याची शक्यता असली तरी मविआमध्ये एका जागेसाठी रस्सीखेच असेल...

मविआला एकच जागा, ८ महायुतीच्या पारड्यात! विधान परिषद निवडणूक : भाजपला ५ जागा, काँग्रेसला भोपळा?
यदु जोशी -
मुंबई : विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता असून महायुतीला ८ तर महाविकास आघाडीला केवळ १ जागा मिळेल, असे आमदारांच्या संख्याबळावरून स्पष्टपणे दिसत आहे. उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्याची शक्यता असली तरी मविआमध्ये एका जागेसाठी रस्सीखेच असेल.
राज्यसभा निवडणुकीत मविआकडे एकच जागा आली होती. त्यावर तिन्ही पक्षांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना संधी दिली. त्यामुळे विधान परिषदेची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला दिली जाणार नाही हे स्पष्ट आहे. परिणामी आमदारकीचा कार्यकाळ संपत असलेले या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यावेळी विधान परिषदेवर जाणार नाहीत, असे चित्र आहे.
काँग्रेस एका जागेसाठी अडून बसली तर मविआत पेच निर्माण होईल. भाजप व राष्ट्रवादीकडे (अजित पवार) अतिरिक्त मतांच्या आधारे महायुतीची आठवी जागा निवडून येईल ती व आणखी एक अशा दोन जागा आपल्याला द्याव्यात असा आग्रह अजित पवार गट धरू शकतो.
...तर निवडणूक बिनविरोध
सर्व नऊ आमदारांचा कार्यकाळ येत्या मे मध्ये संपणार आहे. त्या आधी एप्रिलमध्ये निवडणूक होईल. राज्यसभेवेळी शरद पवार हे उमेदवार असल्याने निवडणूक बिनविरोध झाली होती. यावेळी उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असेल.
उद्धवसेनेचे २०, काँग्रेसचे १६ व राष्ट्रवादीचे (शरद पवार) १० असे एकूण ४६ आमदार आहेत. एक जागा जिंकण्यासाठी २९ चा कोटा आहे. काँग्रेस शिवायही उद्धवसेना-राष्ट्रवादी (शरद पवार) हे एकत्रित एक जागा जिंकू शकतात पण ते काठावरचे असेल.
एकनाथ शिंदेंचे धक्कातंत्र, की?
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पुन्हा संधी मिळेल, असे मानले जाते. डॉ. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर संधी दिल्याने वंचित राहिलेले पक्षातील बरेचसे नेते विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे दोन जणांची निवड करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कसरत होणार आहे.
आमचाच दावा : वडेट्टीवार
काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, मविआच्या कोट्यातील एक जागा काँग्रेसलाच मिळाली पाहिजे. राज्यसभेत आम्ही शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहिलो, काँग्रेसला आता संधी द्यावी.