महाराष्ट्रात प्राण्यांवर होते सर्वात जास्त क्रूरता; एनसीआरबीने पहिल्यांदाच केली प्राणी हिंसेची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 16:06 IST2026-05-15T16:03:19+5:302026-05-15T16:06:07+5:30

Nagpur : प्राण्यांवरील क्रूरता आणि अत्याचाराच्या गुन्ह्यांची राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) वतीने राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच स्वतंत्र नोंद करण्यात आली आहे.

Maharashtra has the highest cruelty to animals; NCRB records animal cruelty for the first time | महाराष्ट्रात प्राण्यांवर होते सर्वात जास्त क्रूरता; एनसीआरबीने पहिल्यांदाच केली प्राणी हिंसेची नोंद

Maharashtra has the highest cruelty to animals; NCRB records animal cruelty for the first time

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
प्राण्यांवरील क्रूरता आणि अत्याचाराच्या गुन्ह्यांची राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) वतीने राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच स्वतंत्र नोंद करण्यात आली आहे. मात्र, प्रथमच झालेल्या या नोंदीत मराठी माणसांसाठी 'नकोशी' नोंद आहे. एनसीआरबीने जाहीर केलेल्या २०२४च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात प्राणी क्रूरतेचे २९२७ गुन्हे नोंदविण्यात आले असून, महाराष्ट्र देशात अव्वल ठरले आहे.

एनसीआरबीच्या 'क्राइम इन इंडिया २०२४'च्या अहवालानुसार, देशभरात ९,०३९ प्राणी क्रूरतेची प्रकरणे नोंदविण्यात आली असून, त्यांपैकी तब्बल २,९२७ गुन्हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे राज्यात प्राण्यांवरील वाढत्या अत्याचारांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. अहवालानुसार, देशभरातील या प्रकरणांमध्ये १०,३१२ आरोपींना अटक करण्यात आली. आरोपपत्र दाखल होण्याचे प्रमाण सुमारे ९६.७ टक्के, तर दोषसिद्धीचे प्रमाण ८०.५ टक्के नोंदविण्यात आले आहे. प्राणी कल्याण कार्यकर्त्यांनी याचे स्वागत करताना, ही केवळ नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या असून प्रत्यक्ष अत्याचारांचे प्रमाण यापेक्षा अधिक असू शकते, असे म्हटले आहे.

प्राणी क्रूरतेच्या घटनांमध्ये गाईच्या तस्करीपासून, श्वानांवरील हिंसाचार, मांजर, घोडे, गाढव, शेळ्या आदी प्राण्यांवर होणाऱ्या मानवी क्रूरतेचादेखील समावेश आहे. यापूर्वी 'प्रिव्हेन्शन ऑफ कुएल्टी टू अॅनिमल्स अॅक्ट, १९६०' अंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची स्वतंत्र आकडेवारी उपलब्ध नव्हती. त्यामुळे अनेक प्रकरणे लपवली व दडपली जात होती. मात्र, आता भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि एनसीआरबीच्या स्वतंत्र नोंदीमुळे, प्राण्यांवरील हिंसा हा आता किरकोळ गुन्हा न राहता एक गंभीर फौजदारी गुन्हा म्हणून ओळखला जाईल. या आकडेवारीमुळे भविष्यात प्राणी कल्याणासाठी ठोस धोरणे आखणे आणि न्यायालयांमध्ये जनहित याचिका दाखल करणे अधिक सोपे होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

नागपुरात यावर्षी १० ते १२ गुन्ह्यांची नोंद

  • देशात पाटणानंतर दुसऱ्या क्रमांकाची क्राइम सिटी म्हणून आता नागपूरची ओळख निर्माण झाली आहे. त्यात आता प्राणी क्रूरतेच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
  • यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत शहरात प्राणी क्रूरतेच्या १० ते १२ प्रकरणांची नोंद झाल्याचे 'सेव्ह स्पीचलेस'च्या स्मिता मिरे यांनी सांगितले.
  • फेब्रुवारी महिन्यात झिंगाबाई टाकळी परिसरात २० ते २५ श्वानांना विष टाकून मारण्यात आले होते. या प्रकरणी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल आहे.
  • श्वानांच्या लहान पिल्लांवर अॅसिड फेकून त्यांना जाळल्याचे अमानवीय कृत्य यावर्षीच घडले होते.
  • नुकताच पाचपावली पोलिस स्टेशनअंतर्गत श्वानांना खाऊ घालणाऱ्या महिलेशी छेडछाड करणाऱ्या एका आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. शहरात भटक्या कुत्र्यांवरील हल्ले, विषप्रयोग आणि गुरांची बेकायदेशीर वाहतूक यांसारखे गंभीर गुन्हे सातत्याने घडत आहेत.
  • प्राणी कल्याण संस्थांनी प्राणी संरक्षण कायद्यांची कठोर अंमलबजावणी, प्राणी निवाऱ्यांची सुधारित व्यवस्था आणि व्यवस्थापनाची मागणी केली आहे.


 

Web Title : महाराष्ट्र में पशु क्रूरता सबसे अधिक; NCRB ने पहली बार मामले दर्ज किए

Web Summary : एनसीआरबी के पहले राष्ट्रीय आंकड़ों के अनुसार, महाराष्ट्र में पशु क्रूरता के सबसे अधिक मामले दर्ज किए गए। 2024 में, महाराष्ट्र में देश भर में 9,039 मामलों में से 2,927 मामले दर्ज किए गए, जिससे पशु कल्याण के बारे में चिंता बढ़ गई। नागपुर में बढ़ती घटनाओं से सख्त प्रवर्तन और बेहतर पशु देखभाल की आवश्यकता पर बल दिया गया है।

Web Title : Maharashtra Tops in Animal Cruelty; NCRB Records First-Ever Cases

Web Summary : Maharashtra recorded the highest number of animal cruelty cases in India, according to NCRB's first-ever national data. In 2024, Maharashtra reported 2,927 cases out of 9,039 nationwide, raising concerns about animal welfare. Nagpur sees rising incidents, emphasizing the need for stricter enforcement and improved animal care.