LMOTY 2026: कोविड काळातील 'देवदूत'! डॉ. गौतम भन्साली यांना लोकमतकडून वैद्यकीय क्षेत्रात मानाचा पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 19:09 IST2026-03-10T19:09:01+5:302026-03-10T19:09:59+5:30
Lokmat Maharashtrian Of The Year Awards 2026: जनसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल डॉ. गौतम भन्साली यांना प्रतिष्ठित 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६' च्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

LMOTY 2026: कोविड काळातील 'देवदूत'! डॉ. गौतम भन्साली यांना लोकमतकडून वैद्यकीय क्षेत्रात मानाचा पुरस्कार
जनसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल बॉम्बे हॉस्पिटलचे प्रसिद्ध फिजिशियन डॉ. गौतम भन्साली यांना प्रतिष्ठित 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६' च्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. एका भव्य सोहळ्यात त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि वैद्यकीय सेवेचा सन्मान करण्यात आला. डॉ. गौतम भन्साली हे केवळ एक डॉक्टर नसून ते हजारो रुग्णांसाठी आशेचा किरण ठरले आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' लाईव्ह:
संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ आणि मार्गदर्शक
डॉ. भन्साली हे कोविड-१९, डेंग्यू, मलेरिया, क्षयरोग, आणि एचआयव्ही यांसारख्या गंभीर संसर्गजन्य आजारांचे नामवंत तज्ज्ञ आहेत. वैद्यकीय सेवेसोबतच ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दरवर्षी दोन पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून भविष्यातील डॉक्टर घडवण्याचे कामही चोख बजावत आहेत.
कोविड काळातील 'देवदूत'
संकटकाळात माणुसकी कशी जपली जाते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. भन्साली आहेत. त्यांनी ८,००० पेक्षा अधिक कोविड रुग्णांवर सलग दोन वर्षे एकही रुपया फी न घेता ऑनलाइन उपचार केले. 'गोल्डन अवर फाउंडेशन' आणि इतर एनजीओंच्या माध्यमातून त्यांनी मुंबईतील झोपडपट्टी भागात सुमारे ३ कोटी रुपयांचे मोफत लसीकरण पूर्ण केले.
सीपीआर जनजागृतीचा ध्यास
रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी पहिल्या तासाचे महत्त्व ओळखून त्यांनी 'गोल्डन अवर फाउंडेशन' ची स्थापना केली. त्यांनी देशभर १,५०० हून अधिक शिबिरे घेऊन लोकांना प्रशिक्षण दिले. या मोहिमेसाठी गायक शान आणि गीतकार मनोज मुंतशीर यांनी तयार केलेल्या गीताचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. भन्साली यांच्या कामाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड: २०१६ मध्ये सर्वाधिक मधुमेह रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
शासकीय जबाबदारी: ते मुख्यमंत्री मदत निधी (मुंबई समिती) चे प्रमुख.
मानद फिजिशियन: महाराष्ट्र राज्यपालांचे आणि मुंबई पोलिसांचे ते मानद फिजिशियन म्हणून सेवा.
व्यसनमुक्ती: 'Elevate the Real High' या उपक्रमाद्वारे ते तरुणांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करत आहेत.
संशोधन आणि शैक्षणिक योगदान
वैद्यकीय क्षेत्रात केवळ प्रॅक्टिस न करता त्यांनी संशोधनावरही भर दिला आहे. त्यांचे १० पेक्षा जास्त संशोधन लेख आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. तसेच ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) अकॅडमिक बोर्डाचे सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत.