Eknath Shinde : "करतो, बघतो, सांगतो हे शब्द अजितदादांच्या डिक्शनरीत नव्हते"; एकनाथ शिंदेंची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 13:41 IST2026-01-28T13:38:30+5:302026-01-28T13:41:35+5:30
Eknath Shinde And Ajit Pawar : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Eknath Shinde : "करतो, बघतो, सांगतो हे शब्द अजितदादांच्या डिक्शनरीत नव्हते"; एकनाथ शिंदेंची भावुक पोस्ट
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या आज बारामती येथे सभा होणार होत्या, त्या सभांसाठी ते सकाळी मुंबईहून विमानाने बारामती येथे येत असतानाच हा अपघात झाला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "एक मोठा भाऊ गमावल्याचं मला दुःख आहे. करतो, बघतो, सांगतो हे शब्द अजितदादांच्या डिक्शनरीत नव्हते. ओठात एक आणि पोटात एक असा अजितदादांचा स्वभावच नव्हता. गेली ४० वर्षे राजकारणात दादांनी त्यांचा दबदबा कायम ठेवला. पवार कुटुंबावरही काळाने घाला घातलाय" असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. "आज महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अत्यंत वेदनादायी, धक्कादायक दिवस आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा धक्का संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी प्रचंड मोठा आहे. एक दिलखुलास मनमिळावू, कर्तृत्ववान, अभ्यासू आणि रोखठोक नेता आपण आज गमावला. अजितदादा माझ्यापेक्षा वयाने मोठे होते आणि राजकारणातील अनुभवानेही. एक उमदा सहकारी आणि त्यापलीकडे एक मोठा भाऊ गमावल्याचं मला दुःख आहे."
आज महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अत्यंत वेदनादायी, धक्कादायक दिवस आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा धक्का संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी प्रचंड मोठा आहे. एक दिलखुलास मनमिळावू, कर्तृत्ववान, अभ्यासू आणि रोखठोक नेता आपण आज गमावला.…
\— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 28, 2026
"करतो, बघतो, सांगतो हे शब्द अजितदादांच्या डिक्शनरीत नव्हते. चूक दाखवण्याची, प्रसंगी कानउघाडणी करण्याची हिंमत त्याच्यात होती. ओठात एक आणि पोटात एक असा अजितदादांचा स्वभावच नव्हता. बोलायला रोखठोक परंतु मनाने अतिशय निर्मळ असलेला हा नेता होता. कार्यकर्त्यांचा नेता अशी त्यांची ओळख होती. सामान्य माणसाला ते आपले वाटत असत. आमदार, खासदार आणि मंत्री अशी मोठी राजकीय कारकीर्द अजितदादांनी आपल्या कर्तृत्वाने गाजवली. गेली ४० वर्षे राजकारणात दादांनी त्यांचा दबदबा कायम ठेवला."
"प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणारे दादा आज चुकीच्या वेळी गेले..."; जितेंद्र आव्हाड भावुक
"अजितदादांनी ६ वेळा उपमुख्यमंत्री पद भूषविले. वित्त, नियोजन, सिंचन, जलसंसाधन, ऊर्जा या खात्यांमध्ये त्यांनी अत्यंत उल्लेखनीय आणि लोकाभिमूख काम केलं. कृषी, सहकार क्षेत्राची खडानखडा माहिती त्यांच्याकडे होती. आर्थिक घडामोडींचे अचूक भान त्यांना होतं. महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक विषयांची त्यांना जाण होती. प्रशासनावर त्यांची मजबूत पकड होती. अर्थमंत्री म्हणून राज्याची आर्थिक घडी दादांनी कधी विस्कटू दिली नाही. विकासकामांना खीळ बसू न देता आम्ही जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेला निधीही कमी पडू दिला नाही. राज्यातील अनेक विकास प्रकल्पांसाठी आर्थिक तरतूद त्यांनी केली."
"मतभेद होते पण आदर कायम..."; अजित पवारांच्या निधनाने प्रियंका चतुर्वेदींना अश्रू अनावर
"आज दादा आपल्यात नाहीत आणि उद्यापासून ते दिसणारही नाहीत, ही कल्पना सुद्धा मनाला पटत नाही. पवार कुटुंबावरही काळाने घाला घातलाय. त्यांच्यासाठी हा क्षण अत्यंत दुःखद असून त्यांच्या सांत्वनासाठी कोणतेही शब्द अपुरेच पडणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील लाखो लोकांमध्ये आज पोरके झाल्याची भावना आहे. अजितदादांच्या निधनामुळे राज्याची अपरिमित हानी झाली आहे. मी शिवसेनेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो" असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.