“शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘सांगली पॅटर्न’ राज्यभर राबवा!”; विश्वजीत कदम यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 16:30 IST2026-03-04T16:30:05+5:302026-03-04T16:30:05+5:30
Vishwajeet Kadam Vidhan Bhavan News: या संकल्पनेचे अजितदादांनी जाहीरपणे कौतुक करत, ती संपूर्ण राज्यात राबविण्याचा मानस व्यक्त केला होता, याची आठवण विश्वजित कदम यांनी करून दिली.

“शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘सांगली पॅटर्न’ राज्यभर राबवा!”; विश्वजीत कदम यांची मागणी
Vishwajeet Kadam Vidhan Bhavan News: राज्यातील जिल्हा परिषद शाळांची घसरलेली गुणवत्ता आणि दयनीय अवस्था लक्षात घेता सांगली जिल्ह्यात यशस्वी ठरलेल्या ‘मॉडर्न शाळा’ संकल्पनेचा अवलंब संपूर्ण राज्यात करावा, अशी ठाम आणि आग्रही मागणी डॉ. विश्वजीत कदम यांनी विधानसभेतील लक्षवेधी चर्चेदरम्यान केली.
अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. विद्यार्थ्यांसाठी पुरेशा भौतिक सुविधा नाहीत, स्वच्छतागृहांची कमतरता आहे, सुसज्ज प्रयोगशाळा नाहीत, तर अनेक शाळा शिक्षकांविना किंवा केवळ एकाच शिक्षकावर चालत आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावर उपाय म्हणून २०२० ते २०२३ या कालावधीत महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सांगली जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांच्या पुढाकारातून ‘मॉडर्न शाळा’ संकल्पना राबविण्यात आली. या उपक्रमामुळे शाळांची भौतिक व शैक्षणिक गुणवत्ता उंचावली, तसेच जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्येत लक्षणीय वाढ झाली. हा ‘सांगली पॅटर्न’ राज्यासाठी आदर्श ठरू शकतो, असे डॉ. कदम यांनी नमूद केले.
दरम्यान, या संकल्पनेचे स्वर्गीय अजित दादा यांनीही जाहीरपणे कौतुक केले होते आणि ती संपूर्ण राज्यात राबविण्याचा मानस व्यक्त केला होता, याची आठवण त्यांनी करून दिली. राज्यातील शिक्षणव्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी ‘मॉडर्न शाळा’ योजनेसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करून ती तातडीने राज्यभर राबवावी, अशी ठाम मागणी डॉ. विश्वजीत कदम यांनी केली.