“संधी असताना अजितदादांना CM केले नाही, हयात असताना काका कसे वागले?”; विखे पाटलांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 23:07 IST2026-02-19T23:04:40+5:302026-02-19T23:07:37+5:30
Radhakrishna Vikhe Patil News: अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी होती तेव्हा ती का मिळू दिली नाही? याचे उत्तर राज्यातील जनतेला मिळावे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

“संधी असताना अजितदादांना CM केले नाही, हयात असताना काका कसे वागले?”; विखे पाटलांची टीका
Radhakrishna Vikhe Patil News: उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचा विमान अपघात हा पायलटचा वापर करून केलेला घातपात असल्याचा दावा करत याप्रकरणी तज्ज्ञ समिती नेमून चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली. रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघातावर मुंबईत तिसरी पत्रकार परिषद घेतली. विमान चालवणाऱ्या ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीच्या मालकांशी नागरी उड्डाण मंत्र्यांचे ‘मैत्रीपूर्ण’ संबंध असल्याने निष्पक्ष चौकशी होण्याबाबत शंका निर्माण होते. त्यामुळे चौकशी होईपर्यंत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांना पदावरून दूर करावे, असेही ते म्हणाले. रोहित पवार सातत्याने अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी प्रश्न उपस्थित करत आहेत. यावर भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा एकदा रोहित पवार आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
ही घटना राजकारणातील मोठी आणि वेदनादायक घटना आहे. सर्वांनाच त्याचे दुःख आहे. मात्र काही लोक दुःखात आधार देण्याऐवजी लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हणत विखे पाटील यांनी रोहित पवारांना राजकारण थांबवण्याचा आणि कुटुंबाला आधार देण्याचा सल्ला दिला यापूर्वी होता. यानंतर आता पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, अजित पवार जेव्हा हयात होते, तेव्हा तुम्ही त्यांचेसोबत कसे वागला? हे लोकांना माहित नाही का? तुम्ही आणि काका कसे वागले? अजित पवारांना तुम्ही कधी सन्मान मिळू दिला का? अशी विचारणा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
संधी असताना अजितदादांना मुख्यमंत्री केले नाही
काँग्रेसच्या काळात राष्ट्रवादीच्या जागा येऊनही त्यावेळी अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी कोणी नाकारली? अपघाताच भांडवल करण्यापेक्षा अगोदर याचे उत्तर महाराष्ट्राला द्या, असे म्हणत रोहित पवार यांच्या भूमिकेवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी शंका उपस्थित केली आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची जेव्हा संधी होती तेव्हा ती का मिळू दिली नाही? याचे उत्तर राज्यातील जनतेला मिळावे, ही माझी अपेक्षा, असे म्हणत विखे पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्यासह थेट शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
दरम्यान, या प्रकरणात CBI चौकशीची मागणी करण्यात आली असून, मुख्यमंत्र्यांनीही DGCI (डायरेक्टर जनरल ऑफ क्राईम इन्व्हेस्टिगेशन) यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. आता वेगवेगळ्या गोष्टी पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय, हे योग्य नाही. अशा दुर्दैवी घटनेवर राजकारण करणे हे अधिक दुर्दैवी आहे. सत्य जे आहे ते समोर येईलच. या प्रकरणाचे राजकारण करू नये, असे विखे पाटील म्हणाले होते.