सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड; NCP आमदारांनी एकमताने मान्य केला ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 14:54 IST2026-01-31T14:53:19+5:302026-01-31T14:54:17+5:30

विधिमंडळ पक्षाचे गटनेतेपद हे प्रशासकीय कामकाजात अतिशय महत्त्वाचे असते. विधिमंडळात पक्षाची भूमिका मांडण्यापासून व्हिप जारी करण्याचे अधिकार त्याच्याकडे असतात.

Ajit Pawar Death: Sunetra Pawar elected as legislative group leader; NCP MLAs unanimously approve resolution | सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड; NCP आमदारांनी एकमताने मान्य केला ठराव

सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड; NCP आमदारांनी एकमताने मान्य केला ठराव

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे. शनिवारी विधान भवनात झालेल्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत एकमताने हा ठराव मान्य करण्यात आला. अजित पवारांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. त्यात विधिमंडळ गटनेतेपद जास्त काळ रिक्त ठेवणे योग्य नव्हते. त्यामुळे तातडीने पक्षातील नेत्यांनी हालचाली सुरू करत अजित पवारांच्या अकाली एक्झिटमुळे रिक्त झालेल्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड केली आहे. या निवडीनंतर संध्याकाळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असं बोलले जाते. 

शुक्रवारी रात्री उशीरा बारामतीहून सुनेत्रा पवार आणि जय पवार हे मुंबईच्या दिशेने निघाले. सुनेत्रा पवारांनी पक्षाची सुत्रे हाती घ्यावीत अशी मागणी नेत्यांकडून होत होती. त्यात सकाळी देवगिरी निवासस्थानी येत सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. याच ठिकाणी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जनभावना लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांच्या नावाची निवड करण्यात आली. त्यानंतर हे सगळे नेते बैठकीतून बाहेर पडले. मग सुनेत्रा पवारांसह सगळेच नेते विधान भवनात पोहचले. याठिकाणी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात अजित पवारांच्या प्रतिमेला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीला सुरुवात झाली.

या बैठकीत पक्षाचे विधानसभा, विधान परिषदेचे आमदार उपस्थित होते. त्याशिवाय पक्षाचे नेते सुनील तटकरे, प्रफुल पटेल हेदेखील उपस्थित होते. विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत छगन भुजबळ यांनी सूचक म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला २ आमदारांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली. या निवडीनंतर आता राष्ट्रवादीचे पत्र विधिमंडळ सचिवांसह मुख्यमंत्र्‍यांकडेही पाठवले जाईल. विधिमंडळ पक्षाचे गटनेतेपद हे प्रशासकीय कामकाजात अतिशय महत्त्वाचे असते. विधिमंडळात पक्षाची भूमिका मांडण्यापासून व्हिप जारी करण्याचे अधिकार त्याच्याकडे असतात. त्यामुळे या पदावर सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याने पक्षाचे नेतृत्वच त्यांच्याकडे आले आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांची राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून निवड होणार आहे. संध्याकाळी लोकभवनात साध्यापद्धतीने हा शपथविधी पार पडेल. या निवडीनंतर सहा महिन्याच्या आत सुनेत्रा पवार यांना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहापैकी एकाचे सदस्य बनावे लागेल. त्याआधी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा सोपवला आहे. सहा महिन्यात पोटनिवडणुकीत त्यांना विजयी होऊन विधिमंडळाचे सदस्य बनणे बंधनकारक आहे. अजित पवारांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील दिशा आणि वाटचाल कशी असणार हे सुनेत्रा पवार यांना ठरवावे लागणार आहे.  

Web Title : सुनेत्रा पवार विधिमंडल दल नेता चुनी गईं; बनेंगी उप मुख्यमंत्री

Web Summary : अजित पवार के निधन के बाद सुनेत्रा पवार सर्वसम्मति से एनसीपी विधानमंडल दल की नेता चुनी गईं। उनके उप मुख्यमंत्री बनने की उम्मीद है, जिससे पार्टी के लिए एक नया मार्ग प्रशस्त होगा। उन्होंने राज्यसभा से इस्तीफा दे दिया। छह महीने के भीतर, उन्हें विधानमंडल के किसी भी सदन का सदस्य बनना होगा।

Web Title : Sunetra Pawar Elected Leader; Set to be Deputy Chief Minister

Web Summary : Sunetra Pawar unanimously elected NCP legislative group leader after Ajit Pawar's passing. She's expected to become Deputy Chief Minister, paving a new path for the party. She resigned from Rajya Sabha. Within six months, she must become a member of either house of the legislature.