महिला शिक्षिकेच्या अपहरणाचा प्रयत्न; सरपंचासह दोघांना ३ वर्षे सक्तमजुरी!
By राजकुमार जोंधळे | Updated: May 7, 2026 00:16 IST2026-05-07T00:16:02+5:302026-05-07T00:16:42+5:30
५० हजारांचा दंड : लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

महिला शिक्षिकेच्या अपहरणाचा प्रयत्न; सरपंचासह दोघांना ३ वर्षे सक्तमजुरी!
राजकुमार जाेंधळे, लातूर : परीक्षा केंद्रावर कॉपी रोखल्याच्या रागातून महिला शिक्षिकेचा विनयभंग करून त्यांना गाडीत टाकून अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बेलकुंडच्या सरपंचासह दोघा आरोपींना ५ मे राेजी लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.आर. भोसले यांनी तीन वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी ५० हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
सहायक सरकारी वकील मीरा कुलकर्णी यांनी सांगितले, औसा-तुळजापूर महामार्गावरील मनाेहर तांडा येथील प्रतिभा निकेतन माध्यमिक आश्रम शाळेत इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेसाठी पीडित महिला शिक्षिका ‘बैठे पथक’ म्हणून कार्यरत होत्या.
दरम्यान, परीक्षा केंद्रावर कॉपी करण्याला मज्जाव केल्याने आरोपी संतापले होते. आरोपी विष्णू निवृत्ती कोळी (सरपंच, बेलकुंड) आणि शरद मारुती पवार यांनी इतर साथीदारांसह पीडित महिलेला अश्लील शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर, ‘तुला पळवून नेतो, तुझे तुकडे करतो’ अशी धमकी देत तिला जबरदस्तीने ओढत गाडीत बसवले. सुदैवाने, प्रत्यक्षदर्शींनी वेळीच धाव घेतल्याने पीडितेची सुटका झाली. या गुन्ह्याचा तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक एस. वाय. धुमाळे यांनी तपासाची चक्रे फिरवून पुरावे गोळा केले. तसेच ट्रायल मॉनिटरिंग सेलचे सहायक पाेलिस निरीक्षक मनाने यांनीही या खटल्यात सहकार्य केले.
न्यायालयाचा निकाल अन् वकिलाचा युक्तिवाद...
या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील मीरा मनोज कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. ‘समाजात जबाबदार पद भूषवणाऱ्या व्यक्तीने महिला कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणून केलेले हे कृत्य नैतिक अध:पतनाचे लक्षण आहे,’ असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात ठामपणे केला.
दाेन्ही आराेपींना ५० हजारांचा दंड...
खटल्याच्या अंतिम सुनावणीअंती लातूर जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर. भोसले यांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि पीडित शिक्षिकेची साक्ष ग्राह्य धरून आरोपींविरुद्ध सबळ पुरावे असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली.