How to Start Passive Income in India: अनेकांना असे वाटते की, दरवर्षी मिळणारी १० टक्के पगारवाढ आणि चांगला पगार आपल्याला श्रीमंत करेल. मात्र, आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, केवळ पगारावर अवलंबून राहणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. 'पगार वाढला म्हणजे संपत्ती वाढली' हा एक मोठा भ्रम असून, त्यामागची खरी गणिते समजून घेणे गरजेचे आहे. आर्थिक सुरक्षितता ही एका नोकरीतून नाही, तर अनेक उत्पन्नाच्या स्रोतांतून येते हे कायम लक्षात ठेवून योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे.
पगार का अपुरा पडतो? 'ही' आहेत ३ मुख्य कारणे, करा नियोजन
महागाईचा फेरा: पगार १०% वाढला तरी तो दुप्पट व्हायला ७वर्षांहून अधिक काळ लागतो. तर, जीवनावश्यक वस्तूंचा खर्च दरवर्षी ६ ते ७ टक्क्यांनी वाढत असतो. याचा अर्थ पगार वाढला तरी तुमची खरेदीशक्ती स्थिर राहते. तुम्ही खर्च भागवू शकता, संपत्ती निर्माण करू शकत नाही.
केवळ बचतीने पैसा संपतो : मुदत ठेवींवर (एफडी) ७ टक्के परतावा मिळत असला तरी, मध्यमवर्गीयांसाठी महागाईचा खरा दर १२ टक्के आहे. म्हणजेच, बँकेत ठेवलेल्या पैशांचे मूल्य दरवर्षी कमी होत आहे. तुम्ही बचत करत नाही, तर आपले भांडवल हळूहळू संपताना पाहत आहात.
एकच उत्पन्नावर विसंबून : आजच्या काळात नोकरी किंवा उद्योग कधी बदलेल याचा नेम नाही. नोकरी गेली किंवा आरोग्य बिघडले तर उत्पन्नाचा दुसरा पर्याय नसणे हे सर्वात मोठे संकट ठरू शकते. आर्थिक सुरक्षितता ही एका नोकरीतून नाही, तर अनेक उत्पन्नाच्या स्रोतांतून येते.
श्रीमंत होण्यासाठी 'या' ४ उपायांचा करा अवलंब
गुंतवणुकीचे मालक बना : कमी व्याजाच्या योजनांमध्ये पैसे अडकवून ठेवू नका. महागाईवर मात करणाऱ्या इक्विटी, म्युच्युअल फंड किंवा व्यवसायात गुंतवणूक करा.
उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण करा : नोकरीसोबतच साईड इन्कम, डिजिटल उत्पन्न किंवा गुंतवणुकीतून परतावा मिळवण्याचे लक्ष्य ठेवा. यामुळे आर्थिक लवचिकता वाढते.
१५ टक्के नियम पाळा : पगाराच्या किमान १२ ते १८ टक्के रक्कम नियमित गुंतवा. दरमहा १५ हजार रुपये १२ टक्के दराने १५ वर्षे गुंतवले, तर ५५ ते ६० लाख रुपये जमा होऊ शकतात.
कर्ज आणि ईएमआय टाळा: क्रेडिट कार्ड किंवा कर्जावर २२ ते ३६ टक्के व्याज द्यावे लागते. ईएमआय म्हणजे भविष्यातील पगारवाढ आधीच खर्च करणे होय.
लक्षात ठेवा : आधी गुंतवणूक करा, मग उरलेला पैसा खर्च करा. पगार वाढला की तुमची एसआयपी वाढवा!
